Supreme Court : आजोबांच्या संपत्तीवर नातवाचा अधिकार नाही, वडिलोपार्जित संपत्तीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय!
सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश देताना हिंदू उत्तराधिकार अधिनियम, 1956 कायद्याच्या कलम 8 चा आधार घेतला. या कलमाअंतर्गत वडिलांना मिळालेली वडिलोपर्जित संपत्ती ही त्यांची वैयक्तिक संपत्ती ग्राह्य धरली जाते, असं न्यायालयाने आपल्या निकालात सांगितलं.

Court Case : भारतात संपत्तीवरून नेहमीच वाद होतात. कधीकधी हा वाद वाढून थेट न्यायालयापर्यंत पोहोचतो. सध्या असाच 1997 सालचा वाद देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या संपत्तीच्या वादात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलाय. आजोबाच्या संपत्तीची वाटणी झाल्यानंतर वडिलांच्या वाट्याला आलेल्या संपत्तीवर नातू जन्माच्या आधारावर अधिकार सांगू शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार आजोबांकडून मिळालेली संपत्ती ही वडिलांची वैयक्तिक संपत्ती मानली जाईल. यावर नातू कोणताही दावा करू शकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. वडील हयात असताना आजोबांच्या संपत्तीवर नातू वडिलोपर्जित संपत्ती म्हणून हिस्सा मागू शकत नाही, असेही न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
हे प्रकरण 1997 सालातील आहे. संपत्तीसाठी याचिकाकर्त्याने याचिका दाखल केली होती, तेव्हा तो अल्पवयीन होता. त्यामुळे ही याचिका त्याने आपल्या आईच्या मार्फत दाखल केले होती. माझ्या वडिलांना मिळालेल्या माझ्या आजोबांच्या संपत्तीत हिस्सा हवा आहे, अशी मागणी या मुलाने केली होती. संबंधित जमीन ही वडिलोपार्जित आहे. सोबतच संयुक्त हिंदू कुटुंबाची ही संपत्ती आहे. त्यामुळे माझ्या वडिलांसोबतच माझाही संबंधित संपत्तीवर अधिकार आहे, असा दावा या मुलाने केला होता. याचिकाकर्त्याच्या वडिलांनी 1997 साली एक जमीन दोन लोकांना विकली होती. याच संपत्तीवर माझा हक्क आहे, असं याचिकाकर्त्यांचं मत होतं.
कोर्टाने नेमका काय आदेश दिला?
सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश देताना हिंदू उत्तराधिकार अधिनियम, 1956 कायद्याच्या कलम 8 चा आधार घेतला. या कलमाअंतर्गत वडिलांना मिळालेली वडिलोपर्जित संपत्ती ही त्यांची वैयक्तिक संपत्ती ग्राह्य धरली जाते. अशा संपत्तीवर नातवाचा तसेच मुलाचा जन्मत: अधिकार नसतो. न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह आणि न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा निर्णय दिलाय. याचिकाकर्त्याने संबंधित व्यक्तीची याचिकाही फेटाळून लावली. या याचिकेत माझ्या वडिलांना मिळालेल्या माझ्या आजोबांच्या संपत्तीत माझा अधिकार आहे, असा दावा करण्यात आला होता.