मुख्यमंत्री असावा तर असा.. थलपती विजय यांच्या ‘या’ कृतीचं होतंय कौतुक, रुग्णालयांतील भ्रष्टाचाराविरोधात स्पष्ट निर्देश

Thalapathy Vijay : रुग्णालय किंवा वॉर्ड स्तरावरील अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीच्या तक्रारी मिळाल्या, तर कोणताही विलंब न करता त्यांना त्यांच्या पदावरून हटवावं, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री विजय यांनी दिले.

मुख्यमंत्री असावा तर असा.. थलपती विजय यांच्या या कृतीचं होतंय कौतुक, रुग्णालयांतील भ्रष्टाचाराविरोधात स्पष्ट निर्देश
मुख्यमंत्री विजय
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 10, 2026 | 10:04 AM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयकौशल्याने असंख्य प्रेक्षकांची मनं जिंकलेले अभिनेते थलपती विजय हे आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनून नागरिकांची वाहवा मिळवत आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून विजय त्यांच्या कामाने आणि निर्णयांनी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. बुधवारी त्यांनी चेन्नईतील एग्मोरमधल्या एका सरकारी लहान मुलांच्या रुग्णालयाचा अचानक दौरा केला. यावेळी त्यांनी आरोग्याच्या सेवांचं आणि रुग्णालयातील व्यवस्थांचं विस्तृतपणे निरीक्षण केलं. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री अरुणराज आणि स्वास्थ्य विभागाचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या कृतीचं कौतुक

मुख्यमंत्री विजय यांनी रुग्णालयातील विविध वॉर्ड, उपचारांच्या सुविधा आणि रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या मुलांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि उपचारांचा दर्जा, डॉक्टरांची उपलब्धता आणि इतर सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णांना दर्जेदारी आरोग्य सेवा देणं हे सरकारचं प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं. या दौऱ्यादरम्यान थलपती विजय यांच्या एका कृतीचं सध्या सोशल मीडियावर खूप कौतुक केलं आहे. त्यांनी रुग्णालयात लहान मुलांना कुशील उचलून घेतलं होतं. त्यांची ही कृती पाहून रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णही थक्क झाले होते.

पहा फोटो-

या पाहणीदरम्यान रुग्णालयाची पायाभूत सुविधा बळकट करणं, नवीन इमारतींचं बांधकाम, आधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता आणि दीर्घकालीन विकास योजना या विषयांवर अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे त्यांनी रुग्णालयाच्या सध्याच्या कामकाजाविषयी, रुग्णांच्या वाढत्या संख्येविषयी आणि भविष्यातील गरजांविषयीचीही माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. एग्मोरमधील शासकीय बाल रुग्णालय हे तमिळनाडूतील अग्रगण्य बालरोग संस्थांपैकी एक असून तिथं दरवर्षी हजारो रुग्ण दाखल होतात.

भ्रष्टाचार करणाऱ्यांना थारा नाही

थलपती विजय यांनी अधिकाऱ्यांना रुग्णालयांमधील भ्रष्टाचाराविरोधात झिरो-टॉलरन्स (अजिबात सहन न करण्याचं) आणि रुग्णांसाठी भीतीमुक्त वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केलं. आरोग्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी, आधुनिक सुविधा विकसित करण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करत राहील, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. या भेटीनंतर आरोग्य मंत्री अरुणराजा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, मुख्यमंत्री विजय यांना बऱ्याच काळापासून या रुग्णालयाला भेट देण्याची इच्छा होती. त्यांचा उद्देश केवळ औपचारिक पाहणी करण्याचा नव्हता, तर रुग्णालयाची वास्तविक परिस्थिती समजून घेमं आणि भविष्यातील सुधारणांची दिशा ठरवणं हा होता.

यावेळी सरकारी रुग्णालयांमधील भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर खंडणीचा मुद्दाही उघडकीस आला. आरोग्यमंत्री अरुणराजा यांनी कबूल केलं की, काही प्रकरणांमध्ये रुग्णालयातील कर्मचारी नवजात शिशुची काळजी किंवा इतर सेवांच्या नावाखाली रुग्णांच्या कुटुंबीयांकडून बेकायदेशीर पैशांची मागणी करतात. यावर मुख्यमंत्री विजय यांनी ठाम भूमिका घेत अशा कारवायांमध्ये सहभागी असलेल्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.

Follow Us