PM Narendra Modi: हात मिळवला, पुष्पगुच्छ दिला.. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी थलपती विजय चेन्नई एअरपोर्टवर
PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूत अनेक पायाभूत सुविध प्रकल्पांचं उद्घाटन केलं आणि नवीन उपक्रमांची पायाभरणी केली. चेन्नई विमानतळावर पोहोचताच तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी त्यांचं स्वागत केलं.

तमिळनाडूच्या राजकारणात सध्या एका खास भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवारी, 11 ऑक्टोबर) रोजी चेन्नई दौऱ्यावर पोहोचले. यावेळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांनी विमानतळावर त्यांचं उत्साहात स्वागत केलं. विजय यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांना पुष्पगुच्छ भेट दिला. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय आणि मोदी यांची यापूर्वी दिल्लीत भेट झाली होती. मात्र या दौऱ्यात दोघं पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसत आहेत. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलं आहे.
मोदींचं चेन्नई विमानतळावर जंगी स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी सुमारे 11 वाजता चेन्नई विमानतळावर पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री थलपती विजय यांनी त्यांचं स्वागत केलं. दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं. त्यानंतर विजय यांनी मोदी यांना पुष्पगुच्छ दिला. या स्वागतावेळी विमानतळ परिसरात सुरक्षेची कडक व्यवस्था करण्यात आली होती. पंतप्रधानांच्या आगमनानंतर विमानतळाबाहेर भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. मोदी यांचा ताफा बाहेर पडताच समर्थकांनी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. पंतप्रधानांनीही रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना अभिवादन केलं. स्वागतासाठी पारंपरिक नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं.
13 हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन
पंतप्रधान मोदी यांच्या चेन्नई दौऱ्याचा मुख्य उद्देश तमिळनाडूमधील विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी हा आहे. या दौऱ्यात 13 हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांशी संबंधित कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. रस्ते, रेल्वे, बंदरे, पेट्रोलियम आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांतील प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. या विकासकामांमुळे राज्यातील पायाभूत सुविधांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर या दौऱ्यात भर देण्यात आला आहे. चेन्नईसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे मानले जात आहेत.
पहा फोटो-
📸 | CM Joseph Vijay Welcome Modi Ji ! https://t.co/v6ZWXXtiO6
— Prakash Vijay (@PrakazVijay_Of) October 11, 2026
चेन्नई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याकडे सर्वांचं लक्ष
या दौऱ्यातील महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील पूनामल्ली-वडापलानी मार्गाचं उद्घाटन. सुमारे 4,900 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या मार्गामुळे शहरातील वाहतूक अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. या मार्गावर आधुनिक सिग्नल यंत्रणा आणि चालकविरहित रेल्वे संचालनासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मेट्रोमुळे पश्चिमेकडील उपनगरं आणि शहराच्या मध्यवर्ती भागातील संपर्क सुधारण्यास मदत होईल. प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच रस्त्यांवरील वाहतुकीचा ताणही कमी होण्याची शक्यता आहे.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी 3,700 कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. या प्रकल्पांमुळे राज्यातील रस्ते संपर्क अधिक मजबूत होईल आणि प्रवासाचा वेळ कमी होईल. तसंच वाहतूक कोंडी कमी होऊन आर्थिक विकासालाही चालना मिळेल.
