ऑफिसमध्येच सापडले 1,02,79,000 रुपये, रातोरात पोलिसांची रेड, ममता बॅनर्जींना मोठा धक्का

पश्चिम बंगालमधील टीएमसी कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकत 1,02,79,000 रुपये जप्त केले आहेत. ममता बॅनर्जींना यामुळे मोठा धक्का बसला आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या खासगी सहायकाला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. यामागे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप अभिषेक बॅनर्जींनी केला आहे.

ऑफिसमध्येच सापडले 1,02,79,000 रुपये, रातोरात पोलिसांची रेड, ममता बॅनर्जींना मोठा धक्का
TMC cash seizure
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2026 | 1:16 PM

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागे लागलेलं ग्रहण अजूनही सुटता दिसत नाहीये. संकटामागून संकटांची मालिका सुरूच आहे. आधी हातातून सत्ता गेली. त्यानंतर पक्षाच्या चिरफळ्या उडाल्या. आता थेट ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीच्या एका कार्यालयात 1,02,79,000 रुपये सापडले आहेत. पोलिसांनी रातोरात रेड मारून हे घबाड जप्त केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्या खासगी सहायकाला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. हे 1 कोटी 2 लाख रुपये कुठून आणले? कशासाठी आणले? याचा पोलीस शोध घेत आहेत.

डायमंड हार्बर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अभिषेक बॅनर्जी यांचे खासगी सहायक सुमित रॉय यांची कसून चौकशी सुरू असताना पोलिसांना एक महत्त्वाचा धागा मिळाला होता. त्याच्याच आधारे डायमंड हार्बर पोलिसांनी सरिशा परिसरातील टीएमसीच्या एका कार्यालयावर छापेमारी केली. एक टीप मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 1,02,79,000 रुपये सापडले आहेत. पार्टी कार्यालयात जाऊन पोलिसांनी प्रत्येक कोपरा न् कोपरा शोधला होता. त्यावेळी पोलिसांना हे घबाड सापडलं आहे. टीएमसीचं हे कार्यालय मगराहाट पश्चिम येथील टीएमसीचे आमदार शमीम अहमद यांच्याशी संबंधित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Loading...

सुमित राय यांना अटक

या प्रकरणावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिषेक मजूमदार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. त्यांनी या कारवाईची पुष्टी केली आहे. आरोपी सुमित रॉय सध्या अटकेत आहे. त्यांची सातत्याने कसून चौकशी केली जात आहे, असं त्यांनी सांगितलं.

आम्ही सुमित रॉय यांची कसून चौकशी केली. अनेक तास ही चौकशी सुरू होती. त्यावेळी एक धागा मिळाला. त्याच्या आधारे आम्ही कारवाई केली. सरिशा नावाच्या ठिकाणी जाऊन पार्टीच्या कार्यालयावर छापा मारला. एका विशेष राजकीय पक्षाचं हे ऑफिस आहे. या कार्यालयातून 1 कोटी 2 लाख 79 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जसजशी या प्रकरणाची अपडेट येईल, तस तसं कळवलं जाईल, असं अभिषेक मजूमदार यांनी सांगितलं.

पैसा आला कुठून? हात कुणाचा?

काल रात्री SDPO डायमंड हार्बर यांच्या नेतृत्त्वात ही छापेमारी करण्यात आली. गुप्तपणे ही छापेमारी करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असं ते म्हणाले. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा कुठून आला? एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात हा पैसा कसा आला? यामागे कुणाचा हात आहे? हे पैसे इथे कुणी ठेवले? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत आहे.

त्यांना सोडणार नाही

दरम्यान, टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सहा महिन्यापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी या कार्यालयाची तोडफोड केली होती. तिथे खोटे सबूत ठेवले होते. हा परिसर आधी पासूनच पोलिसांच्या चौकशीच्या अंतर्गत आहे. असं असताना तिथे रेड मारण्यात आली. पुराव्याशी छेडछाड करण्यात आली आहे. चौकशी प्रक्रियेला प्रभावित करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप अभिषेक बॅनर्जी यांनी केली आहे. या षडयंत्रात सामील असलेल्या लोकांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us