Yogi Adityanath : पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे का? पहिल्यांदाच योगी आदित्यनाथ मनातलं बोलले

Yogi Adityanath : 'द स्टेट्समॅन' या इंग्रजी वर्तमानपत्राला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रदीर्घ मुलाखत दिली. त्यात अनेक विषयांवर ते बोलले. यात त्यांच्या पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतील मुद्दा सुद्धा होता.

Yogi Adityanath : पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे का? पहिल्यांदाच योगी आदित्यनाथ मनातलं बोलले
Yogi Adityanath
| Updated on: Sep 20, 2026 | 1:47 PM

देशात आत्तापासूनच 2029 लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. 2029 मध्ये भाजपकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असतील? नरेंद्र मोदी की अजून कोणी? याची सतत चर्चा सुरु आहे. नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा हा तिसरा कार्यकाळ आहे. विरोधी पक्षांकडून नरेंद्र मोदींच्या वयाचा दाखला देऊन दुसऱ्या पर्यायांची चर्चा घडवून आणली जाते. भाजपंकडून पंतप्रधानपदासाठी प्रामुख्याने तीन नावं चर्चेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. भाजपचे हे तिन्ही नेते नेतृत्वाने आणि कतृर्त्वाने खूप मोठे आहेत. आपल्या कामाने त्यांनी राज्यांच्या आणि देशाच्या राजकारणात आपली छाप उमटवली आहे. 2029 मध्ये पंतप्रधानपदासाठी ज्यांच्या नावाची चर्चा होते, त्या योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच या प्रश्नावर मौन सोडलं आहे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘द स्टेट्समॅन’ या इंग्रजी वर्तमानपत्राला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रदीर्घ मुलाखत दिली. त्यात अनेक विषयांवर ते बोलले. यात त्यांच्या पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतील मुद्दा सुद्धा होता. त्यांना विचारण्यात आलं की, 2027 नंतर तुमच्या राष्ट्रीय राजकारणातील भूमिकेची सातत्याने चर्चा होते, तुम्ही स्वत:ला भविष्यातले पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाहता का? की यूपीचं तुमची कर्मभूमी राहिलं?. या प्रश्नावर पहिल्यांदाच योगी आदित्यनाथ स्पष्टपणे बोलले.

पंतप्रधानपदाच्या प्रश्नावर योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

“मी एका जबाबदारीच्या भावनेने सार्वजनिक जीवनात उतरलोय. राष्ट्र प्रथम हे माझं पहिलं तत्व आहे. सन्मानीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाने मला उत्तर प्रदेशच्या 25 कोटी जनतेची सेवा करण्याची जबाबदारी सोपवली आहे. सार्वजनिक जीवनातील हा मी माझा मोठा सन्मान समजतो. त्याचवेळी ती एक मोठी जबाबदारी आहे. आर्थिक, सामाजिक आणि सुशासन या मार्गाने राज्याला पुढे नेण्यावर माझं सर्व लक्ष आहे” असं उत्तर योगी आदित्यनाथ यांनी दिलं. या उत्तरातून योगी आदित्यनाथ यांनी सध्या तरी दिल्ली आपल्या डोक्यात नाही हे स्पष्ट केलं.

लाभार्थ्यांना जात नसते

2027 विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी-काँग्रेस आघाडी पीडीएला प्राधान्य देत आहे. कायदा-सुव्यवस्थेला ते मुद्दा बनवणार. 2024 मधील लोकसभेचे आकडे पाहता जातीचं गणित कसं बसवणार? असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांना विचारण्यात आला. “प्रतिनिधीत्व, महत्वकांक्षा, स्थानिक मुद्दे, सुशासन, उमेदवार अशा अनेक घटकांनी निवडणूक आकाराला येते. त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सरकारचा येणारा अनुभव. 2017 आणि 2022 च्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी आणि दलित समुदायाने या सरकारला भरभरुन साथ दिली. कारण कुठल्याही भेदभावाशिवाय सुशासन त्यांच्यापर्यंत पोहोचलं” असं योगी म्हणाले. “लाभार्थ्यांना जात नसते. लाभार्थी असा वर्ग आहे, जो जातीपलीकडे आहे. ते आमचं गणित आणि रसायन दोन्ही आहे” असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us