केदारनाथच्या दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील दोन भाविकांवर काळाचा घाला,अति पावसाने डोंगर खचला

kedarnath route accident : केदारनाथ मंदिर परिसरात मोठा पाऊस सुरू आहे. यामुळे मंदिराकडे जाणाऱ्या पायी मार्गाचा डोंगर खचला. डोंगरावरील दगड कोसळून तीन भविकांचा मृत्यू झाला आहे. यातील महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे.

केदारनाथच्या दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील दोन भाविकांवर काळाचा घाला,अति पावसाने डोंगर खचला
kedarnath temple
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 21, 2024 | 8:40 PM

उत्तराखंडमधील गौरीकुंड – केदारनाथ पायी मार्गावर चिरबासाजवळ डोंगर खचून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. केदारनाथच्या पायी मार्गावर रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. या मार्गावर डोंगरावरील दगड आणि माती कोसळल्याने केदारनाथच्या दर्शनासाठी जाणारे काही भाविक जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. मातीच्या ढिगाऱ्यातून अद्याप तीन जणांचे मृतदेह काढण्यात आले आहेत. मृत आणि जखमी व्यक्तींमध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमधील भाविकांचा समावेश आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

केदारनाथ येथील या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, डीडीआर आणि प्रशासनाच्या पथकांसह यात्रा मार्गावर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून तीन जणांना बाहेर काढले. तर, तीन प्रवाशांचा या दुर्घटनेत जागीच मृत्यू झाला. या अपघातात 8 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन जणांचा समावेश आहे. किशोर अरुण पराते (31, नागपूर), सुनील महादेव काळे (24, जालना) अनुराग बिश्त (तिलवाडा रुद्रप्रयाग) अशी मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांची नावे आहेत.

चिरबासा हे भूस्खलन क्षेत्र आहे. 16 किलोमीटर लांब हे क्षेत्र गौरीकुंड केदारनाथ चालण्याच्या मार्गावर आहे. पावसाळ्यात डोंगरावरून दगड पडण्याच्या घटना येथे घडत असतात. या पायी मार्गानेच केदारनाथ मंदिरात पोहोचता येते. त्यामुळे प्रशासनाने प्रवाशांना पावसाळ्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन केले होते.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदनसिंग राजवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी आपत्ती नियंत्रण कक्षाला अपघात झाल्याची माहिती मिळाली. केदारनाथ यात्रा मार्ग चिरबासाजवळील डोंगरावरून मातीचा ढिगारा आणि मोठमोठे दगड आल्याने काही यात्रेकरू ढिगाऱ्याखाली दबले गेले. जखमींपैकी दोघे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत तर इतर तीन जण उत्तराखंडचे रहिवासी आहेत.

मुख्यमंत्री यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी X वर आपला संदेश लिहून या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. केदारनाथ यात्रेच्या मार्गाजवळील टेकडीवरून ढिगारा आणि मोठमोठे दगड पडल्यामुळे काही यात्रेकरूंच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. याबाबत मी सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने चांगले उपचार देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. देव दिवंगतांच्या आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असे मुख्यमंत्री धामी यांनी म्हटले आहे.