
रेल्वे प्रवास सर्वात स्वस्त आणि आरामदायी असतो.त्यामुळे लांबपल्ल्याचा प्रवास शक्यतो रेल्वेने केला जातो. परंतू रेल्वेची तिकीट कन्फर्म नसली तर प्रवाशांची द्विधा अवस्था होते. रेल्वेचे तिकीट कन्फर्म होईल की नाही याची काहीही शाश्वती नसल्याने आता प्रवासाची तयारी करायची की नाही या टेन्शनमध्ये प्रवासी असतात. चार्ट चार तासांपूर्वी तयार होतो. काही लोकांचे घर टर्मिनसपासून लांब असते. त्यामुळे त्यांना घरातून लवकर निघायचे असते. त्यामुळे यातून वाचण्यासाठी तुम्ही तिकीट बुक होताच समजू शकता की तिकीट कन्फर्म होणार की नाही ते…कसे ते जाणून घ्या….
रेल्वेच्या तिकीटांची प्रतिक्षा यादी 200 ते 300 पर्यंत लांबली जाते. सणासुदीत आणि सुटीच्या हंगामात ट्रेनच्या तिकीटांना प्रचंड मागणी असते. अशा वेळी वेटिंग 500 पर्यंत पोहचते. अशा वेळी वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता कमी असते. कारण प्रवासी 60 दिवसांपूर्वी तिकीट बुकींग करत असतात. खूपच अपवादात्मक वेळेस प्रवासी तिकीट रद्द करतात. परंतू सामान्य दिवसात सुमारे 26 टक्के वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता असते.
कन्फर्म तिकीट मिळाल्यानंतर सुमारे 21 प्रवासी प्रवास करीत नाही.असे प्रवासी कन्फर्म तिकीट रद्द करतात. तसेच चार्ट बनल्यानंतर सुमारे 5 टक्के प्रवासी प्रवास रद्द करतात. त्यांची आसने रिकामी राहातात. त्यामुळे या प्रकारे सामान्य रुपात एकूण वेटिंग तिकीटांपैकी 26 टक्के प्रवासी प्रवास करीत नाहीत.त्यांच्या बदल्यात वेटिंग तिकीट कर्न्फम होण्याची शक्यता 26 टक्के असते.
तुमचा वेटिंग क्रमांक पाहून या प्रकारचे कॅल्क्युलेशन करु शकता. एक स्लीपर वा थर्ड एसी कोचमध्ये 72 आसने असतात. प्रति कोच सरासरी वेटिंग नंबर 17 ते 18 आसने कन्फर्म होण्याची जादा खात्री असते. म्हणजेच सामान्य दिवसात 17 ते 18 तिकीटांची कर्न्फम होण्याची शक्यता असते.या प्रवाशांची तिकीट कन्फर्म होऊन आरएसी किंवा पूर्ण बर्थ मिळू शकते.
उदाहरणार्थ सर्वसामान्य लांबपल्ल्या गाड्यांना 22 ते 24 कोच असतात. इंजिन आणि गार्डच्या कोच शिवाय 4 कोच जनरल असतात. तसेच 8 कोच स्लीपर असतात. अशा प्रकारे या कोचमध्ये 75 ते 80 वेटिंगपर्यंत तिकीट कन्फर्म होते. आता ट्रेन सुटण्यापूर्वी चार तास आधी चार्ट तयार होतो. परंतू, आता ट्रेन सुटण्यापूर्वी 24 तास आधी चार्ट तयार करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन घेणार आहे.