बंगालमध्ये भाजपाचा पहिला मुख्यमंत्री कोण ? शुभेंदु अधिकारी यांच्यासह ही पाच नावे शर्यतीत
पश्चिम बंगालमध्ये भाजपाला सर्वात मोठे यश मिळाले आहे. आता भाजपाचा मुख्यमंत्री बंगालमध्ये कोण होणार याकडे लक्ष लागले आहे. मोदी आणि शाह ही जोडगोळी कोणत्या हातात मुख्यमंत्री पद सोपवतात याकडे तमाम नजरा लागल्या आहेत.

पश्चिम बंगालमध्ये भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. मात्र, मुख्यमंत्री पदासाठी पक्षाने अजूनही कोणता चेहरा घोषीत केलेला नाही. पीएम मोदी यांनी पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले आहे.आता पंतप्रधान पीएम मोदी आणि अमित शाह यांच्याशी चर्चा करुन आता बंगाली मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
भाजपा राज्यातील निवडणूकांना समोरे जाताना सर्वसाधारणपणे मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर करत नाही. बंगालमध्ये देखील पंतप्रधान मोदीच पक्षाचा सर्वात मोठा चेहरा होते. त्यांनी प्रचारासाठी २० हून अधिक रॅली केल्या. गेल्या एक महिनाभर मोदी संपू्र्णपणे बंगाली रंगात रंगून गेलेले दिसले. त्यांनी बंगालचे प्रसिद्ध स्ट्रीट फूड ‘झालमुरी’ चा आस्वाद घेतला. आणि बंगाली भाषेत ऑडीओ संदेश देखील जारी केले. बंगाली जनतेने देखील ब्रँड मोदी यांच्यावर संपूर्ण विश्वास व्यक्त करीत भाजपाला भरपूर मताचे दान केले.
भाजपा बंगालमध्ये आपली उपस्थिती मजबूत स्थापित करण्यासाठी एक ताकदवान मुख्यमंत्री निवडू इच्छीत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक प्रचारादरम्यान वारंवार सांगितले की जर भाजपा सत्तेत आली तर बंगालीच मुख्यमंत्री दिला जाईल. केंद्रीय मंत्री सुकांत मझुमदार यांनी देखील दावा केला की बंगालचा पुढील मुख्यमंत्री ‘मांसाहारी’असेल !
महिला मुख्यमंत्री पदावर डाव खेळणार का ?
भाजपाने निवडणूक प्रचारा दरम्यान महिलांच्या सुरक्षेसंदर्भात सर्वाधिक आश्वासने दिली. त्यामुळे अशी आशा केली जात आहे की पार्टी कोणा महिला मुख्यमंत्री बनवू शकते. सध्या दिल्लीच्या शिवाय कोणत्याही राज्यात भाजपाचा महिला मुख्यमंत्री नाही.
भाजपाने आपल्या महिला समर्थक छबीला आणखी मजबूत करण्यासाठी बंगालमध्ये महिला सीएम देण्याचा डाव देखील खेळू शकते. मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत अग्निमित्रा पॉल आणि रुपा गांगुली यांची नावे पुढे येत आहेत.रुपा गांगुली यांनी बी.आर.चोपडा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत द्रौपदीचे कॅरेक्टर साकारीत घराघरात प्रसिद्धी मिळवली होती.
शुभेंदु अधिकारी
शुभेंदु अधिकारी हे मुख्यमंत्री पदाचे मुख्य दावेदार मानले जात आहे. एकेकाळी ममता बॅनर्जीचे सहकारी असलेले शुभेंदु अधिकारी यांना बंगालमध्ये मजबूत पकड आणि संघनात्मक नेटवर्क आहे. २०२१ मध्ये त्यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून ते ‘जायंट किलर’ बनले होते. मात्र, नारदा स्टिंग प्रकरणात त्यांचे नाव सामील होते. त्यामुळे मुख्यमंत्री बनण्याच्या मार्गात ते अडसर ठरू शकते.
दिलीप घोष
2021 मध्ये भाजपाला प्रमुख विरोधी पक्ष बनवण्याचे श्रेय माजी प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांना दिले जाते.ते आता प्रदेशाध्यक्ष नसले तरी बंगाली राजकारणावर त्यांचा प्रभाव कायम आहे.त्यामुळे तेही बंगाल सीएमच्या शर्यतीत मोठे दावेदार मानले जात आहेत.
समीक भट्टाचार्य
बंगाल भाजपाचे अध्यक्ष समीक भट्टाचार्य यांना पार्टीत सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेते म्हणून पाहिले जाते, त्यांनी पडद्याच्या मागे राहून भाजपाच्या विस्तारात मोठी भूमिका निभावली आहे.अशात भाजपा त्यांच्यावर बंगालचे नेतृत्व सोपवू शकते.
अग्निमित्रा पॉल
पेशाने फॅशन डिझायनर अग्निमित्र पॉल भाजपाच्या स्पष्टवक्त्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी या निवडणूकीत त्यांची आसनसोल दक्षिण जागा कायम राखली आहे. जर भाजपाने राज्यात महिला सीएमचा विचार केला तर अग्निमित्रा त्यांची पसंत असू शकतात.
रूपा गांगुली
माजी राज्यसभा खासदार आणि सोनारपूर दक्षिण येथील आमदार म्हणून रुपा गांगुली यांनी महिला मोर्च्याच्या अध्यक्ष म्हणून जमीनीस्तरावर काम केले आहे. त्यांची प्रसिद्धी पाहता त्यांना देखील बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून संधी दिली जाऊ शकते.
निशिथ प्रामाणिक
निशिथ प्रामाणिक यांचेही नाव बंगालच्या सीएम पदाच्या शर्यतीत आहे. मात्र आता पाहायला हवे की पंतप्रधान मोदी आणि अमित शाह ही जोडी कोणच्या हातात बंगालच्या सीएमचे सोपवतात.