‘यापुढे बैलगाडीने जाईन पण…,’ विमान लेट झाल्याने अधिकाऱ्याचा सोशल साईटवर संताप

जलदगतीने प्रवास करण्यासाठी विमान प्रवासाला लोक प्राधान्य देत असतात. परंतू विमान कंपनीच्या कारभाराने वैतागलेल्या एका स्टार्टअप कंपनीच्या उपाध्यक्षाने एक्स सोशल माध्यमावर आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

यापुढे बैलगाडीने जाईन पण..., विमान लेट झाल्याने अधिकाऱ्याचा सोशल साईटवर संताप
Air India (file photo)
| Updated on: Jun 26, 2024 | 10:58 PM

सध्या सोशल मिडीयाचा जमाना आहे. आपल्याला आलेले बरेवाईट अनुभव लोक या माध्यमातून शेअर करीत असतात. सरकारी कामात आलेला अनुभव ते कोणत्याही सार्वजनिक सेवेच्या आलेल्या अनुभव काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करीत असतात. यापुढे मी शंभर टक्के जादा भाडे भरुन दुसऱ्या कंपनीच्या विमानातून जाईन किंवा अगदी बैलगाडीतून प्रवास करेन, पण एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने प्रवास करणार नाही अशी प्रतिक्रीया एका स्टार्टअप कंपनीचे उपाध्यक्ष आदित्य कोंडावार यांनी ( ट्विटर) एक्सवर शेअर केली आहे. त्यांच्या या मासलेवाईक प्रतिक्रीयेला सोशल साईटवर अनेकांनी प्रतिसाद दिला आहे.

नुकताच, एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये बेंगळुरू ते पुणे प्रवास केल्यानंतर, एका व्यक्तीने आलेला अनुभव शेअर केला आहे. एका स्टार्टअप कंपनीचे उपाध्यक्ष आदित्य कोंडावार यांनी ( आधी ट्विटर ) एक्सवर एका पोस्टद्वारे एअर इंडिया विमान कंपनीच्या सेवेबाबत आलेला अनुभव शेअर केला आहे. त्यात त्यांनी लिहिले, ‘प्रिय एअर इंडिया, काल रात्री मला चांगला धडा शिकवल्याबद्दल धन्यवाद. मी हे सर्व गांभीर्याने सांगत आहे – मी माझ्या आयुष्यात कधीही एअर इंडिया एक्स्प्रेस किंवा एअर इंडियाची फ्लाइट पकडणार नाही – जर गरज पडली तर मी 100% जादा पैसे देऊन दुसऱ्या कंपनीच्या विमानाने प्रवास करेन किंवा अगदी बैलगाडी घेऊन जाईन. परंतू या एअर इंडियाच्या वाट्याला जाणार नाही असे कोंडावार यांनी लिहीले आहे.

कोंडावार पुढे लिहितात, ‘ माझ्या 9.50 च्या फ्लाइटने 12.15/12.20 ला उड्डाण घेतले. फ्लाईटमध्ये सर्वत्र दुर्गंधी येत होती आणि सीट्स अतिशय घाणेरड्या आणि डागाळलेल्या होत्या. काल पहाटे 1.50 वाजता पुण्यात माझा दिवस सुरू झाला – एका मोठ्या फॅक्टरीतून गेलो आणि अनेक मॅनेजमेंट मीटिंगमध्ये बसलो आणि पहाटे 3 वाजता घरी पोहोचलो. मला टाटा समूह आणि त्यांच्या नेत्यांबद्दल खूप आदर आहे – मी त्यांच्याकडून नेहमीच परिपूर्णतेची अपेक्षा करतो पण प्रामाणिकपणे, हे एक डिझास्टर आहे!’

एअर इंडिया एक्सप्रेसने लगेच त्यांच्या पोस्टला प्रतिसाद दिला आणि समस्येचे त्वरित निराकरण करण्याचे आश्वासन दिले आहे. कंपनीने लिहिले- ‘हाय आदित्य! तुमच्या फ्लाइटमधील गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. कृपया हे ध्यानात घ्या ह्या फ्लाईटला आमच्या नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे उशीर झाला. आम्ही तुम्हाला आलेल्या अनुभवाबाबत कारणांचा मागोवा घेऊ आणि या समस्येचे त्वरित निराकरण करू’

एक्स वरील पोस्ट येथे वाचा –

अनेकांच्या कमेंट

आदित्यच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिले – माझ्यासोबत याहूनही वाईट घडले होते, माझी फ्लाइट 4 तास उशिराने पोहोचली होती. दुसऱ्या एका युजरने दावा केला, ‘ऐकून क्षमस्व, परंतु माझी केस अधिक भयानक होती. जेव्हा मी दोहाहून दिल्लीला जात होतो तेव्हा माझी सीट अत्यंत अस्वच्छ होती.’