‘बाल्ड अ‍ॅन्ड ब्युटीफूल’! कर्करोग दिनानिमित्त डॉ. इनामदार यांचा कॅन्सर रुग्णांसाठी प्रेरणा देणारा आशादायी लेख

रिना विशीतील एक सुंदर तरुणी व्हीलचेअरमध्ये बसून डॉ. बी बरुआ कॅन्सर रुग्णालयातील ओपीडीमध्ये आली. कॅन्सर या नावानेच भल्याभल्यांना धडकी भरते अशा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नुकतंच तारुण्यात पदार्पण केलेल्या तरुणीला पाहून क्षणभर मन हेलावले.

बाल्ड अ‍ॅन्ड ब्युटीफूल! कर्करोग दिनानिमित्त डॉ. इनामदार यांचा कॅन्सर रुग्णांसाठी प्रेरणा देणारा आशादायी लेख
Image Credit source: TV 9
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 5:40 AM

मुंबई : रिना विशीतील एक सुंदर तरुणी व्हीलचेअरमध्ये बसून डॉ. बी बरुआ कॅन्सर रुग्णालयातील (Cancer Hospitalओपीडीमध्ये (OPD) आली. कॅन्सर या नावानेच भल्याभल्यांना धडकी भरते अशा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नुकतंच तारुण्यात पदार्पण केलेल्या तरुणीला पाहून क्षणभर मन हेलावले. ज्याअर्थी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आली होती त्याअर्थी नक्कीच कॅन्सरच्या निदान अथवा उपचारासाठी आली असणार हे स्पष्ट होतं. चेहऱ्यावरील भीती आणि विरक्ती लपवताना तिच्या मनाची होणारी घालमेल मला स्पष्टपणे दिसत होती. मेडिकल ओन्कलॉजी (Medical Oncology) विभागात सिनियर रेसिडेंट डॉक्टर असल्याने युनिट प्रमुख डॉक्टर रॉय सर यांनी तिची केस माझ्याकडे सोपवली. रिनाच्या प्राथमिक तपासण्या, एमआरआय सिटीस्कॅन व बायोप्सी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तिला व तिच्या कुटुंबीयांना धीर देऊन पुन्हा ओपीडीमध्ये भेटण्यास सांगितले. सर्व आवश्यक त्या चाचण्या करून, ते चार-पाच दिवसांनी ओपीडीमध्ये सकाळी हजर झाले.

किमोथेरपी नंतर तिसऱ्या-चौथ्या दिवसापासून तिचे डोक्यावरील केस गळू लागले

दुर्दैवाने कर्करोगाने रिनाच्या शरीरामध्ये प्रवेश केला होता, तिला सार्कोमा या स्नायूच्या कर्करोगाने ग्रासले होते. सार्कोमाने तिच्या ओटी पोटातील बराचसा भाग व्यापला होता. डॉक्टर रॉय सरांनी तातडीने तिची केस ट्यूमर बोर्ड मिटींगमध्ये  इतर सहकारी कॅन्सर तज्ज्ञांसमोर सादर केली. त्यानंतर तिच्यावर त्वरित उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला किमोथेरपी त्यानंतर सर्जरी आणि रेडिएशन थेरपी असा उपचारांचा क्रम ठरवण्यात आला. रिनाचे उपचार पुढील सात ते आठ महिने चालणार होते आता तिची किमोथेरपी सुरू झाली होती. दरम्यान संभाव्य धोक्यांची पूर्वकल्पना रुग्णांना देणे आवश्यक असल्यामुळे साईड इफेक्ट्स बद्दल आम्ही माहिती दिलीच होती. थकवा, केस गळणे, रक्तपेशींचे प्रमाण घटणे व त्यामुळे उद्भवणारे जंतुसंसर्ग असे काही साईड इफेक्ट्स अपेक्षित होते. साधारणतः किमोथेरपी नंतर तिसऱ्या चौथ्या दिवसापासून तिचे डोक्यावरील केस गळू लागले. स्त्रीच्या सौंदर्यामध्ये केसांचा अत्यंत मोलाचा वाटा असतो असं म्हटलं जातं आणि ते काही वावगं नाही कारण रीनाला कॅन्सर पेक्षा केस गळण्याचे अधिक दुःख होत होते.

..पण मनाचे सौंदर्य आहे चिरंतन असते

जेव्हा जेव्हा मी तिच्या चेकअपसाठी जात असे तिचा पहिला प्रश्न म्हणजे डॉक्टर माझे केस परत येतील ना? मी पुन्हा पहिल्यासारखी दिसेन का? ती तासनतास आरशासमोर स्वतःला कडे बघत रडत असे. तिची अगतिकता स्पष्टपणे दिसत असली तरी आम्हीदेखील हतबल होतो कारण तिला या दुर्धर आजारापासून बरं करण्यासाठी किमोथेरपी देणे आवश्यक होते. हळूहळू दिवसागणिक तिच्या मनाची तयारी होऊ लागली, नाईलाजास्तव का होईना पण तिने सर्व गोष्टींचा स्वीकार केला होता. आता तिच्या डोक्यावरील सर्व केस गळून पडले होते. इंग्रजीमध्ये डोक्यावरील केस गळून पडणे अथवा टक्कल पडणे याला ‘बाल्ड’ असं संबोधतात. रीना पूर्णपणे बाल्ड दिसत होती आणि तितकीच कणखर देखील. पहिल्या दिवशी पाहिलेली लांबसडक दाट केस असलेली रीना आणि आताची बाल्ड रीना या दोन्ही प्रतिमा माझ्यापुढे तरळत होत्या. माझ्या दृष्टीने तिचे सौंदर्य यत्किंचितही कमी झाले नव्हते उलट मला ती पहिल्यापेक्षा अधिक सुंदर दिसत होती. शारीरिक सौंदर्य हे कालानुरूप जीर्ण होईल पण मनाचे सौंदर्य आहे चिरंतन असते याचा प्रत्यय आज आला होता. Today Though Reena was Bald, She was more beautiful than before.

..तर कर्करोगाला आळा घालणे शक्य

भारतातील कर्करोगाचे वाढते प्रमाण हे चिंताजनक आणि भयावह आहे भारतात दरवर्षी अंदाजे अकरा लक्ष नवीन रुग्णांना कॅन्सरचा प्रादुर्भाव होतो. नऊ लक्ष लोक मृत्युमुखी पडतात. तंबाखूजन्य पदार्थ व मद्यपान यांचे सेवन, स्थूलता लठ्ठपणा, तणावपूर्वक जीवनशैली, बदलत्या आहारविषयक सवयी, हिपॅटायटीस एचपीव्ही एच पायलोरी जंतुसंसर्ग ही वाढत्या कर्करोगाची प्रमुख कारणे आहेत. सुमारे तीस ते पस्तीस टक्के कर्करोग प्रतिबंधात्मक उपाय योजनाद्वारे पूर्णपणे टाळता येऊ शकतात याबद्दल समाजात जागरुकता निर्माण करण्याची नितांत गरज आहे. व्यसनमुक्ती, नियमित व्यायाम, जीवनशैली व आहारातील सकारात्मक बदल, हिपॅटायटीस व एचपीव्ही लसीकरण तसेच नियमित कॅन्सर स्क्रीनिंग असे काही महत्त्वाचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. याचा प्रभावीपणे वापर करून कर्करोगाला आळा घालणे शक्य आहे.

पंढरपूर, बार्शीत दरमहा शेकडो रुग्णांवर उपचार

सध्या कॅन्सर निदान व उपचार यामध्ये झपाट्याने प्रगती होत आहे. किमोथेरपी बरोबरच इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी, प्रोटॉन बिम थेरपी अशा अत्याधुनिक आणि अत्यंत प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध होत आहेत, परंतु त्या अत्यंत खर्चिक असल्यामुळे त्यांचा वापर मर्यादित आहे. या सुविधा ग्रामीण रुग्णांपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान आहे. पंढरपूर व बार्शी येथील कॅन्सर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमार्फत दरमहा शेकडो रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. महाराष्ट्र शासनाची ही योजना कॅन्सर रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरली आहे. अधिकाधिक ग्रामीण रुग्णालयांमध्ये या उपचार पद्धती उपलब्ध करण्याची गरज आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजना, लोकसहभाग व समाज जागृतीद्वारे कर्करोगाविरुद्ध यशस्वी लढा देण्यासाठी आपण सर्वजण सज्ज होऊयात.

डॅा. अमित अब्लुल इनामदार, कॅन्सर तज्ज्ञ

ई-मेल – dramit17@gmail.com
संपर्क – 7002301690

संबंधित बातम्या

तरुणांनो ‘दिल’ जपा, तुम्हाला हृदयविकारांची संकेत देणारी ‘ही’ लक्षणं जाणवतायत?

Corona Updates| कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत औरंगाबादेत 46 बळी, मागील आठ दिवसात 20 रुग्णांचा मृत्यू!

डिलीवरी नंतर अर्धवट सोडलेले करीअर पूर्ण करायचे स्वप्न पाहताय? तर काही टिप्सच्या आधारे पुन्हा घेऊ शकता गगन भरारी!