Goa Liberation Day | गोवा आज 60वा मुक्तिदिन साजरा करतंय, पण खरंच गोवा मुक्त झालाय का?

राम मनोहर लोहिया यांनी गोव्यातील लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. मुक्तिसंग्रामाचा लढा उभा राहिला. अहिंसेनं स्वातंत्र्य मिळवण्याची राम मनोहर लोहिया यांची इच्छा होती खरी. पण...

Goa Liberation Day | गोवा आज 60वा मुक्तिदिन साजरा करतंय, पण खरंच गोवा मुक्त झालाय का?
| Edited By: | Updated on: Dec 19, 2021 | 10:54 AM

19 डिसेंबर. गोव्याचा मुक्तिदिन (#GoaLiberationDay). याच दिवशी पोर्तुर्गीजांनी गोव्यातून काढता पाय घेतला. भारतीय सैन्याला (Indian army) यश मिळालं. छोटंसं जरी असलं, तरी महत्त्वाचं असलेलं गोवा (Goa) हे राज्य मुक्त झालं. गोव्यावर तिरंगा फडकला. भारत ‘आजादी का अमृतमहोत्सव’ (#AzadiKaAmritMahotsav) साजरा करत असला तरी गोवा स्वतंत्र व्हायला बरीच वर्ष गेली. 1947 ते 1961 या भारतीय स्वातंत्र्याच्या काळातही गोवा पारतंत्र्यातच होता.

लोहियांनी मुक्तीची बीजं रोवली!

राम मनोहर लोहिया

राम मनोहर लोहिया यांनी गोव्यातील लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. मुक्तिसंग्रामाचा लढा उभा राहिला. अहिंसेनं स्वातंत्र्य मिळवण्याची राम मनोहर लोहिया यांची इच्छा होती खरी. पण या मुक्तिसंग्रामाच्या शेवटी-शेवटी सैन्यानं बजावलेल्या भूमिकेमुळे अखेर शस्त्रदेखील गोव्याला मुक्त करण्यासाठी वापरावी लागलीच. पण तो दिवस अखेर उजाडला. गोवा मुक्तिसंग्रामातील अनेक स्वातंत्र्य सैनिक, अनेक हुतात्मे आणि भारतीय सैन्याच्या लढ्यापुढे पोतुर्गीजांनी हार मानली आणि 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा स्वतंत्र झाला.

‘गोंयकार’ खरंच मुक्त झालाय?

आपला हिरक महोत्सव संपूर्ण गोवाभर आज साजरा होत आहे. या हिरक महोत्सवानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हजेरी लावतील. सध्या भाजपचं सरकार गोव्यात आहे. डॉ. प्रमोद सावंत या सरकारचं नेतृत्त्व करत आहेत. पुढच्या काहीच महिन्यात गोव्याच्या निवडणुका होणार आहेत. त्याचे पडघम वाजायला सुरुवातही झाली आहे. राजकीय नेतेमंडळीच्या या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याचे पारंपरीक प्रकारही वेगानं घडू लागलेत. या सगळ्या पार्श्वभूमी मुक्त झालेल्या गोव्यातील ‘गोंयकार’ जनता खरंच मुक्त झाली आहे का?, याचा उहापोह होणंही तितकंच गरजेचंय.

राष्ट्रपतींनी दिल्या गोव्यातील जनतेला मुक्तिदिनाच्या शुभेच्छा

2021 मध्ये गोवा मुक्तिच्या साठीचं वर्ष साजरं होत असताना अनेक लक्षणीय गोष्टी गोव्यात घडल्या. त्या ठळकपणे नमूद होण्याची गरज आहे. अथांग समुद्र किनारा, निसर्गरम्य पर्यटन क्षेत्र, देवळं, चर्च, संग्रहालयं, छोटी-छोटी बेटं, टुमदार घरं, गोव्याची दारु, काजू, मासे या सगळ्याबाबत जाणून घेणं, ही कुतूहलाची गोष्ट ठरते. पण साठाव्या वर्षात गोव्यानं अनेक चित्रविचित्र गोष्टी अनुभवल्या. ज्यानं गोवा खरंच मुक्त झालाय की नाही, यावरही सवाल उपस्थित केले होते.

आयआयटीविरोधातलं आंदोलन

गोव्यात 2021 महिन्याच्या जानेवारीतच प्रचंड मोठं आंदोलन झालं. उत्तर आणि दक्षिण अशा दोन जिल्ह्यांमध्ये गोवा विभागलेला आहे. त्यातील उत्तर गोव्यात असलेल्या सत्तरी तालुक्यातील शेळ-मेळावलीत असलेल्या लोकांनी आपल्या जमिनींसाठी लढा देत ऐतिहासिक आंदोलन केलं होतं. या आंदोलनामुळे अखेर शेळ मेळावलीत प्रस्तावित असलेला आयआयटीचा प्रकल्प पुन्हा एकदा सरकारला स्थगित करावा लागला होता.

शेळ मेळावतीली आंदोलक

शेळ-मेळावलीतल्या आंदोलनानंतर गोव्यातील जमीन मालकीचा मुद्दा ऐरणीवर आला. त्या पार्श्वभूमीवर जमीन मालकी, पोर्तुगीजकालीन जमिनीचे किचकट कायदे, यावरुन लोक अधिक जागृत झाली. अनेक वर्ष एका जागेत अनेक पिढ्या एका कुटुंबाच्या जगल्या. पण त्या जागेची मालकी अजूनही कुटुंबांकडे नसल्याची अनेक प्रकरणं गोव्यात समोर आली. गावच्या गावंही या सगळ्यात समोर आली. अखेर या गंभीर विषयाची दखल घेत डॉ. प्रमोद सावंत सरकारनं गोवा भूमी अधिकारीणी हे विधेयक गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवी वर्षातच आणलं. सुरुवातीला या विधेयाला गोवा भूमीपुत्र अधिकारीणी विधेयक नाव देण्यात आलंय, मोठा वादही झाला होता.

गोव्यात ओला-उबर नाही!

2021 या वर्षात गोव्यानं टॅक्सीचालकांच्या आंदोलनाचीही झलक पाहिली. ऍप आधारीत टॅक्सी सेवेला स्थानिक टॅक्सी चालक-मालक संघटनांनी तीव्र विरोध केला. याविरोधातही मोठा संघर्ष पेटल्याचं 2021 या वर्षात पाहायला मिळालं.

गोवा हे पर्यटनासाठीचं देशातील महत्त्वाचं केंद्र. पण मेट्रो सिटीप्रमाणे गोव्यात ओला-उबर नाही, हे वास्तव आहे. गोव्यात ऍप आधारीत टॅक्सीच नाही अशातलाही भाग नाही. गोवा माईल्स नावाचं एक सरकारच्या प्रयत्नातूनच उभं राहिलेलं ऍप आहेच. पण त्यालाही स्थानिक टॅक्सीचालकांचा विरोध आहे. डिजिटल मीटरचा मुद्दा, ऍपला विरोध यावरुन सरकारला वेळोवेळी टुरीस्ट टॅक्सी चालकांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. हे सगळं घडलंय गोवा मुक्त झाल्यानंतर 60व्या वर्षात.

मात्र या सगळ्यात प्रवाशांसाठी सुविधेचं असलेल्या ओला-उबर सारख्या सेवा जागतिक पातळीवर स्वीकारल्या जात आहेत. त्यांच्यासारखे अनेक स्पर्धक बाजारात रोज उतरत आहेत. गोव्यात पर्यटनाला आणखी चालना मिळेल, प्रवासाच्या दृष्टीनं अधिक सोयीची गोष्ट ठरेल अशी ऍप आधारी टॅक्सी सेवा गोव्याला स्वीकारायला अजूनही जमलेली नाही. ही गोष्ट स्थानिक टॅक्सी चालकांच्या मुळावर उठेल, असा युक्तिवाद केला जातो. काहीप्रमाणात तो खराही असला, तरिही त्यावर गोव्यासारख्या इंटरनॅशनल गाव असलेल्या भागाचं ऍप आधारीत टॅक्सी नसल्यानं नुकसान होतच नसेल, असंही ठामपणे म्हणता येत नाही!

वादळ-महापुरानं हाहाकार

Pramod Sawant in flood

हीरक महोत्सवातलं 2021 हे वर्ष गोव्याच्या ग्रामीण भागासाठी अधिक महत्त्वाचं आणि तितकंच लक्षात राहण्यासारखं ठरलं. याच वर्षी गोव्यानं पूर अनुभवलं. गेल्या 39 वर्षांत गोव्यात अनुभवला नव्हता असा पूर गोव्यात पाहिला. अनेकजण बेघर झाले. काहींचे संसार पुरात बुडाले. जलमय झालेल्या परिसरामुळे जनजीवन विस्कळीत झालं. शेती-बागायतींचं नुकसान, दरडी कोसळलं, मुके प्राणी वाहून जाणं, झाडांची पडझड, गाड्यांचं नुकसान, यानं अनेक लोकं त्रस्त झाले होते. तर दुसरीकडे पुराआधीच तौक्ते वादळानं गोव्याला तडाखा दिला होता. त्याच्या जखमा भरुन आलेल्या नव्हत्या, तोच महापुरानंही गोव्याला तडाखा दिला होता.

दुसऱ्या लाटेत कोविड बळी वाढले

गोवा छोटसं असल्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना स्थिती नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश आलं होतं. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गोवा सरकार पूर्णपणे बिथरल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. सर्वाधिक साक्षर आणि सर्वाधिक जीडीप असलेल्या राज्यांपैकी एक असलेल्या राज्यात कोविडची RT-PCR चाचणीचे खासगीतले दर हे इतर राज्यांच्या तुलनेत महागलेलेच होते. तर दुसरीकडे कोविडच्या दुसऱ्या लाटेत तर ऑक्सिजनवरुन राजकारणही तापलं होतं.

तापलेलं राजकारण, गोवा मेडिकल कॉलेजमध्ये अचानकपणे वाढलेल्या मृतांच्या आकड्यांची संख्या, ऑक्सिजन पुरवठ्यावरुन सुरु झालेले आरोप-प्रत्यारोप, लॉकडाऊनच्या वावड्या, ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणताना डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाचा कसही लागला होता. एकट्या मे महिन्यात कोविड बळींचा गोव्यातील आकडा हा प्रचंड वाढलेला होता. कोविडच्या महामारीत ठप्प झालेले व्यवसाय, पर्यटन यांना इतर राज्यांप्रमाणे गोव्यालाही मोठा फटका बसला.

निवडणुका तोंडावर

आता गोव्यातील निवडणुका जवळ आल्यात. राजकीय घडामोडींना वेग आलाय. राजकीय पक्ष आपआपली शक्ती पणाला लावून मतदारांपर्यंत मोजण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

गोवा मुक्तीचं साठावं वर्ष साजरं करत असताना, त्या साठाव्या वर्षातल्या जखमा या भळभळणाऱ्या होत्या. दुसरी लाट आता ओसरली आहे. मोठी आंदोलनं गोव्यात सध्या जरी कुठली नसली, तरिही छोटी-मोठी निदर्शनं गोव्यासाठी नेहमीचीच झालेली आहेत. अशात गोवा मुक्तिनंतरच्या साठाव्या वर्षात गोव्यात ज्या गोष्टी अनुभवल्या, त्यातून गोव्याला स्वयंपूर्ण करण्याचा ध्यास घेतलेल्या गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना अजून खूप लांबचा पल्ला गाठायचाय. गोवा स्वतंत्र होऊन 60 वर्षांचा होतोय. त्याबद्दल शुभेच्छा आहेतच. पण गोवा खरंच मुक्त झालाय का, हा प्रश्न गोव्यातील भारतीय जनतेनं आपल्या मनाला विचारुन बघायला हवा.

60व्या मुक्तिदिनाचा सोहळा – पाहा व्हिडीओ 

इतर बातम्या –

मुंबई NCB ला नवा प्रमुख मिळणार, समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार, नेमकं कारण काय?

Bigg Boss Marathi 3 | Shocking! टिकटॉक स्टार सोनाली पाटील ‘बिग बॉस मराठी 3’मधून बाद?

Chanakya Niti | शत्रूला नेस्तनाबूत करायचं असेल तर चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या 3 गोष्टी वाचायलाच हव्यात