निलेश राणे खासदारकीचं स्वप्न सोडणार? आता लक्ष्य मालवण? काय आहे मालवणचं गणित?

| Updated on: Sep 14, 2021 | 4:35 PM

2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात निलेश राणेंनी मालवण मतदारसंघातून उतरावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. जर तसं घडलं तर यंदाही मालवण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही.

निलेश राणे खासदारकीचं स्वप्न सोडणार? आता लक्ष्य मालवण? काय आहे मालवणचं गणित?
nilesh rane
Follow us on

मालवण : 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात निलेश राणेंनी मालवण मतदारसंघातून उतरावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. जर तसं घडलं तर यंदाही मालवण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही. निलेश राणे हे विद्यमान आमदार वैभव नाईक यांच पानीपत करतात की पुन्हा एकदा वैभव नाईक जाइंट किलर ठरतात हे पाहण्यासाठी 2024 ची वाट पाहावी लागणार…!

मालवण राणेंचा बालेकिल्ला, मात्र वैभव नाईक जायंट किलर

मालवण-कुडाळ मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत राहणारा मतदारसंघ. खरंतर पूर्वीचा हा नारायण राणेंचा बालेकिल्ला. या मतदारसंघावर अगदी 92/95 पासून 2014 पर्यंत राणेंचा कब्जा होता. मात्र गेले दोन टर्म या मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक आमदार म्हणून निवडून येत आहेत. यंदा 2024 च्या निवडणुकीत माजी खासदार निलेश राणेंनी विधानसभा लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. सिंधुदुर्गच्या राजाजवळ कार्यकर्त्यांनी तसं गा-हाणे ही घातलं आहे.

सलग दोन टर्म वैभव नाईक आमदार

2014 पर्यंत मालवण मतदारसंघात आमदार म्हणून नारायण राणेंचीच वर्णी लागत असे. परंतु 2014 ला नवख्या वैभव नाईक यांनी तगड्या राणेंना चारीमुंडया चित करत विजय मिळवला. खरंतर हा निकाल अनपेक्षित होता. मात्र या निकालाने वैभव नाईक यांची राज्यस्तरावर इन्ट्री झाली. त्यांना या विजयानंतर महाराष्ट्रात जाइंट किलर म्हणून संबोधले जाऊ लागले. राणेंचा तो पहिला आणि अनपेक्षित पराभव होता जो संपूर्ण राणे परिवाराच्या जिव्हारी लागला. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीतही राणे समर्थक रणजीत देसाई या उमेदवाराचा पराभव करत आमदार वैभव नाईक यांनी बाजी मारली होती. सलग दोन टर्म आमदार राहिल्यामुळे वैभव नाईक यांचा या मतदारसंघात जनसंपर्क दांडगा निर्माण झाला आहे.

निलेश राणे काय करणार?

निलेश राणे यांनी पहिलीच खासदारकीची निवडणूक लढवून ते खासदार झाले होते. त्यानंतर शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी त्यांचा सलग दोनदा पराभव केला. अर्थात त्यावेळी विनायक राऊत यांच्या सोबत असणारी भाजपची मते यावेळी निलेश राणेंच्या सोबत असणार आहेत. त्यामुळे निलेश राणे यांना संधी दिसत असल्यामुळे ते आणखी एकदा लोकसभेची निवडणूक आजमावतील अस जाणकारांना वाटत आहे.

2019च्या विधानसभा निवडणुकीत मालवण मतदारसंघातून वैभव नाईक यांच्या विरोधात आयत्यावेळी रणजीत देसाई या राणे समर्थकाला मैदानात उतरवलं होत. अगदी शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर होऊनही त्यांनी वैभव नाईक यांना कडवी झुंज दिली होती. त्यामुळे वैभव नाईक यांच्यासमोर जर तगडा उमेदवार असेल तर निवडणुक खूपच रंगतदार होईल, असंही जाणकारांना वाटत आहे.

खासदारकी की आमदारकी?

भाजप पक्षाची एक वेगळी पॉलिसी असते. त्यांची उमेदवारी ही वरिष्ठ पातळीवरून ठरवली जाते. हे आज प्रवीण दरेकरांनी ही स्पष्ट केलं आहे. निलेश राणेंचा अतिआक्रमक स्वभाव पाहता भाजप त्यांना दिल्लीला पाठवायला तयार होईल का? पाठवलं तर निलेश राणे लोकसभा सोडून विधानसभा लढविण्यास तयार होतील का? अशा अनेक जर तर वर निलेश राणेंची उमेदवारी अवलंबून आहे. त्यामुळे वेट अँड वॉच करणंच सोयीचं ठरेल.

(Will Nitesh Rane contest Lok Sabha elections or Vidhan Sabha)