
ATM 10, 20, 50 Rupee Notes: ATM मधून कमी मुल्याच्या नोटा निघत नाहीत. अनेकदा सुट्ट्यांची चणचण जाणवते. एटीएमवर गेल्यावर तिथे अधिक मुल्याच्या नोटा बाहेर पडतात. एटीएमवर 10, 20, 50 रुपयांच्या नोटा मिळत नसल्याने नागरिक नाराज आहेत. सरकारने आता याविषयीचा एक मोठा निर्णय घेतला आहे.

बाजारात 10, 20, 50 रुपयांच्या नोटा कमी झाल्याची ओरड सुद्धा आहे. अनेकदा या नोटा मिळत नाही. बाजारात ग्राहकांना सुट्या पैशांमुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यावर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना बाजारात 10, 20 आणि 50 रुपये मूल्याच्या चलनी नोटांची संख्या कमी झाल्याचा दावा फेटाळून लावला. या नोटा बाजारात मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर लवकरच या नोटा एटीएममधून काढता येतील याविषयीची तरतूद सरकार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, आरबीआई (RBI)नुसार, नियमित एटीएमच्या माध्यमातून कमी मूल्याच्या चलनी नोटांचे वितरण करण्यात येत नाही. पण सरकारने गेल्या काही दिवसांपासून कमी मूल्याच्या नोटा म्हणजे 10, 20 आणि 50 रुपये मूल्याच्या नोटा वितरीत करण्यासाठी प्रयोग सुरू केला आहे.

स्मॉल व्हॅल्यू डिस्पेन्सरच्या माध्यमातून एक पायलट प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या एटीएममधून 10, 20 आणि 50 रुपये मूल्याच्या नोटा नागरिकांना मिळतील. ही एटीएम वेगळी असतील. अथवा मोठ्या एटीएम केंद्रात ही मशीन वेगळी ठेवण्यात येईल. लवकरच हा प्रयोग देशभर राबविण्यात येणार आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात 26 फेब्रुवारीपर्यंत आरबीआयने 10 रुपयांच्या 439.40 कोटी नोटा, 20 रुपयांच्या 193.70 कोटी नोटा आणि 50 रुपयांच्या 130.30 कोटी नोटा बाजारात आणल्या आहेत. गेल्या आर्थिक वर्षात (FY25) 10 रुपयांच्या 180 कोटी नोटा, 20 रुपयांच्या 150 कोटी नोटा आणि 50 रुपयांच्या 300 कोटी नोटा बाजारात आणण्यात आल्या.