‘कुछ कुछ होता है’मधील अंजलीला झालेला गंभीर आजार, लग्नानंतर अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
'कुछ कुछ होता है'मधील बालकलाकार छोटी अंजलि म्हणजे अभिनेत्री सना सईदला झालेला गंभीर आजार. अनेक वर्षानंतर केला मोठा खुलासा.

'कुछ कुछ होता है' या सुपरहिट चित्रपटात लहान अंजलीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सना सईद हिने तिच्या आयुष्यातील एक अत्यंत कठीण काळाबाबत खुलासा केला आहे. अनेक वर्षे ती 'बुलिमिया' या गंभीर खाण्याशी संबंधित मानसिक आजाराशी झुंज देत होती अशी माहिती तिने दिली.

सना सांगते की, कॉलेजच्या काळात सडपातळ दिसण्याच्या वाढत्या दबावामुळे ती विविध डाएट्स करत होती. वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये ती खूप अडकली होती. अभिनय क्षेत्रात सतत कॅमेऱ्यासमोर राहणे आणि दिसण्यावर होणाऱ्या टिप्पणींमुळे हा मानसिक ताण आणखी वाढत गेला.

मात्र, सुरुवातीची जवळपास सहा वर्षे तिला आपण गंभीर आजाराचा सामना करत आहोत याची जाणीवच नव्हती. ती ही केवळ एक वाईट सवय असल्याचे समजून स्वतःच त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती.

यानंतर रिकव्हरीविषयीचे एक पुस्तक वाचल्यानंतर तिला प्रथमच आपण 'बुलिमिया' या ईटिंग डिसऑर्डरची रुग्ण असल्याचे समजले. योग्य उपचार आणि मानसिक आधार मिळाल्यानंतर या आजारातून पूर्णपणे सावरण्यास तिला आणखी चार वर्षे लागली.

सना म्हणाली की, भविष्यात पतीसोबत कोणत्याही भीतीशिवाय आयुष्याचा आनंद घ्यायचा होता. तसेच हा आजार भविष्यात आपल्या मुलांवर परिणाम करू नये, अशी तिची इच्छा होती. त्यामुळे या आजारावर मात करण्याचा तिने ठाम निर्धार केला. 2016 मध्ये सना अभिनय आणि चित्रपटनिर्मितीचे शिक्षण घेण्यासाठी लॉस एंजेलिसला गेली.