2 तास 7 मिनिटांचा तो नवा सिनेमा… ‘धुरंधर २’चा मोडला रेकॉर्ड, अवघ्या 4 दिवसांत कमावले 2080 कोटी!
सध्या बॉलिवूडमधील धुरंधर या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाने जगभरात बक्कळ कमाई केली. पण या चित्रपटाला एका बायोपिकने चांगलीच टक्कर दिली आहे. आता हा चित्रपट कोणता आहे चला जाणून घेऊया...

सध्या बायोपिक चित्रपटांबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळते. जेव्हा एखाद्या मोठ्या कलाकाराच्या किंवा संगीताशी संबंधित व्यक्तिमत्त्वाच्या जीवनावर चित्रपट बनतो, तेव्हा लोकांची वेगवेगळी मते समोर येतात. काहींच्या मते असे चित्रपट प्रेरणा देतात आणि खऱ्या आयुष्यातील संकटे समजून घेण्यास मदत करतात. तर दुसरीकडे, काही प्रेक्षकांचे असे म्हणणे आहे की अनेकदा चित्रपटात पूर्ण सत्य दाखवले जात नाही. काही महत्त्वाचे भाग कमी दाखवले जातात किंवा वगळले जातात. याच कारणामुळे या चित्रपटांवरून वादविवाद होत राहतात आणि सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘माइकल’ चित्रपटाबाबतही असेच वातावरण पाहायला मिळत आहे. हा चित्रपट प्रसिद्ध गायक माइकल जॅक्सन यांच्या जीवनावर आधारित असून याचे दिग्दर्शन अँटोनी फूक्वा यांनी केले आहे. चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. भारतात याची कमाई हळूहळू वाढत असून ती सुमारे २० कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. दुसरीकडे, जगभरात या चित्रपटाने उत्तम कामगिरी केली असून याची कमाई सुमारे २२०.८३ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास २०८० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे हा चित्रपट सतत चर्चेत आहे.

भारतात ‘माइकल’ चित्रपटाची कमाई सुरुवातीला थोडी संथ होती, पण हळूहळू त्यात सुधारणा पाहायला मिळत आहे. प्रेक्षक चित्रपटगृहात जात असल्याने याचे कलेक्शन सतत वाढत आहे. सध्या हा चित्रपट 20 कोटी रुपयांच्या आकड्याच्या जवळ पोहोचला आहे. संगीत प्रेमी आणि माइकल जॅक्सनचे चाहते या चित्रपटाला विशेष पसंती देत आहेत. जरी काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळत असला, तरी चित्रपटाची पकड कायम आहे आणि आगामी काळात त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जागतिक बॉक्स ऑफिसवर ‘माइकल’ चित्रपटाने आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. हा चित्रपट आतापर्यंत २०२६ मधील टॉप चित्रपटांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. याच्या पुढे ‘द सुपर मारियो गॅलेक्सी मूव्ही’, ‘पेगासस ३’, ‘प्रोजेक्ट हेल मॅरी’, ‘हॉपर’ आणि ‘वदरिंग हाईट्स’ सारखे मोठे चित्रपट आहेत. असे असूनही याची कमाई सातत्याने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांत १८०० कोटी कमावणाऱ्या ‘धुरंधर २’ चा विक्रम मोडीत काढला आहे. याशिवाय याने ‘भूत बंगला’ सारख्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे.

येणाऱ्या काळात ‘माइकल’ चित्रपटाकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे. जर प्रेक्षकांचा रस असाच कायम राहिला, तर हा चित्रपट आणखी मोठे विक्रम प्रस्थापित करू शकतो. विशेषतः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील यश याला अधिक बळकट करत आहे. भारतातही कमाई हळूहळू वाढत असल्याने एकूण आकड्यांना फायदा होत आहे. अनेकांचे असे मानणे आहे की, हा चित्रपट पुढे जाऊन 'टॉप ५' मध्येही स्थान मिळवू शकतो. आता सर्वांचे लक्ष याकडे आहे की, याचे अंतिम बॉक्स ऑफिस कलेक्शन किती भव्य असेल.