
बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते आणि लडके कपल म्हणून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन ओळखले जातात. हे कपल अनेकांसाठी उदाहरण ठरले होते. पण काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोट घेत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता त्यांनी थेट दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. नेमकं कारण काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

अभिषेक बच्चनचे एका अभिनेत्रीसोबत अफेअर असल्यामुळे ऐश्वर्याने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात होते. पण गेल्या काही दिवसांपासून ते पुन्हा एकत्र दिसल्यामुळे चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. आता पुन्हा हाय कोर्टातील याचिकेमुळे चर्चांना उधाण आले आहे.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी नुकतीच दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत म्हटले आहे की, यूट्यूबवर त्यांच्या फोटोंचा आणि आवाजाचा गैरवापर केला जात आहे.

बॉलिवूड जोडपे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी यूट्यूब आणि त्याची मूळ कंपनी गूगल यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी 4 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

या जोडप्याने न्यायालयाला विनंती केली आहे की, यूट्यूब आणि संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या व्यक्तिमत्त्व, चेहरा, आवाज आणि प्रतिमांचा बेकायदेशीर आणि आक्षेपार्ह वापर थांबवावा.

सध्या सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये त्यांच्या फोटोंचा आणि आवाजाचा गैरवापर केला गेला आहे. यासाठी त्यांनी याचिका दाखल केली आहे आणि म्हटले आहे की, यूट्यूबवर डीपफेक आणि AI च्या मदतीने बनवलेले बनावट व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहेत, जे त्यांच्या प्रतिमेसाठी योग्य नाहीत. यामध्ये त्यांना खोट्या आणि लज्जास्पद परिस्थितीत दाखवले गेले आहे.

एका व्हिडीओत अभिषेक बच्चन दुसऱ्या अभिनेत्रीला अचानक किस करताना दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओत ऐश्वर्या सलमानसोबत जेवताना दिसत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी दोघांनीही न्यायालयाला विनंती केली आहे की, अशा प्रकारचे कंटेंट त्यांची प्रतिमा खराब करत आहे आणि त्यांच्या गोपनीयतेचा भंग करत आहे. याच कारणामुळे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन गूगलच्या कायदेशीर टीमला नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात यापूर्वी दक्षिणेचे सुपरस्टार नागार्जुन यांनाही दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.