या गाण्यामुळे वाढलेली साड्यांची प्रचंड क्रेझ, दुकानात मिळत नव्हत्या साड्या, गाणं आहे प्रचंड सुपरहिट
जया प्रदा यांचं जितेंद्र यांच्यासोबतचं प्रचंड रोमँटिक गाणं, या गाण्यामुळे दुकानातील साड्यांमध्ये झालेली प्रचंड कमतरता. अनेक ठिकाणी मिळत नव्हत्या साड्या.

1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तोहफा' या सुपरहिट चित्रपटातील 'प्यार का तोहफा तेरा बना है जीवन मेरा' या गाण्याने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. अभिनेत्री जया प्रदा यांनी नुकतीच या गाण्याशी संबंधित खास आठवण सांगितली.

त्या 'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 5' या कार्यक्रमात अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री विशेष पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात स्पर्धक ऋतुराज आणि कोरिओग्राफर वैष्णवी यांनी 'प्यार का तोहफा' या गाण्यावर सादर केलेल्या नृत्यानंतर जया प्रदा यांनी सांगितले की, हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी परिधान केलेल्या साड्यांची देशभरात मोठी फॅशन निर्माण झाली होती.

चित्रपटगृहांमध्ये हे गाणं लागल्यानंतर त्या साड्यांची इतकी मागणी वाढली की अनेक दुकानांत त्या उपलब्धच राहत नसतं. इतकेच नाही जिथे जिथे त्या जात, तिथे लोक 'तोहफा, तोहफा' अशी हाक मारत असत. या गाण्याचा आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गाण्यांमध्ये समावेश असल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मीनाक्षी शेषाद्रीने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक के. राघवेंद्र राव यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत नवा व्हिज्युअल अंदाज आणल्याचे सांगितले. 'प्यार का तोहफा'मधील आकर्षक साड्या ही त्या सर्जनशीलतेचीच झलक असल्याचे त्यांनी नमूद केले.

'तोहफा' हा चित्रपट 1984 मध्ये प्रदर्शित झाला होता. या गाण्याला किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी स्वर दिले होते. गाण्यात जितेंद्र, जया प्रदा आणि श्रीदेवी यांची गाजलेली जोडी पाहायला मिळाली होती.