प्राजक्ता माळीने मुंबईतील या प्रसिद्ध मंदिरात जाऊन केली नागदेवतेची पूजा, शेअर केले खास फोटो
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी मुंबईतील प्रसिद्ध नागदेवी श्री नागम्मा सुवर्ण मंदिरात जाऊन पूजा करत घेतले नागदेवतेचे दर्शन. सोशल मीडियावर शेअर केले फोटो.

श्रावण महिना भगवान महादेवाला प्रिय आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. यंदाच्या श्रावण महिन्याची सुरुवातच एका विशेष योगाने झाली आहे. नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार एकाच दिवशी आल्याने भाविकांमध्ये या दिवसाबद्दल विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.

17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमीचा सण साजरा होत असून, याच दिवशी श्रावणातील पहिला सोमवारही आला आहे. त्यामुळे शिवभक्तांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा ठरला आहे. नागपंचमीच्या निमित्ताने नागदेवतेची पूजा करण्यासोबतच भाविकांनी भगवान महादेवाचे दर्शन घेतले.

दरम्यान, मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही नागपंचमी आणि श्रावणी सोमवारनिमित्त पवईतील ‘नागदेवी श्री नागम्मा सुवर्ण मंदिरा’त जाऊन नागदेवतेचे दर्शन घेतले. यावेळी तिने मंदिरातील दर्शनाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करताना प्राजक्ताने, 'आज खूप वर्षांनी ‘नागपंचमी श्रावणातल्या सोमवारी’ आलीये. #महासंगम #योग” असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

नागपंचमी आणि श्रावणी सोमवारचा एकत्रित योग असल्याने अनेक मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.