
राज्याच्या राजकारणातील एक झंझावात आणि धडाडीचे नेतृत्व, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आज अवघ्या महाराष्ट्रातून जनसागर लोटला आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर आज ठिकठिकाणी बाजार समित्या आणि व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आले आहेत. अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच पुणे, बारामती आणि पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण राज्यातील जनतेला धक्का बसला.

काल सकाळपासूनच शहरातील मुख्य रस्ते ओस पडले आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

अजित पवारांचे पार्थिव सध्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. सध्या लाखो कार्यकर्त्यांची गर्दी उसळली आहे. अजित दादा अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे.

बारामती, पुणे यांसह ठिकठिकाणचे अनेक लोक दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी पोहोचत आहे. सध्या तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळत आहे.

अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. सत्तेत असो वा विरोधात, धोरणात्मक निर्णयांवर आपली पकड असणारा असा नेता पुन्हा होणे कठीण असल्याची प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांकडून येत आहे.