Amitabh Bachchan: कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर बिग बींचा अपघात, पाय घसरला अन्… उभे ही राहता येत नव्हते
Amitabh Bachchan: कौन बनेगा करोडपती 18च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला. त्यांचा पाय घसरला आणि ते पडले. स्वत: अमिताभ बच्चन यांनी याबाबत शोमध्ये माहिती दिली आहे. नेमकं काय घडलं होतं?

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच चर्चेत असणारा शो म्हणून ‘कौन बनेगा करोड़पती’ पाहिला जातो. या लोकप्रिय कार्यक्रमाच्या शूटिंगवेळी एक मोठा अपघात घडला. या शोचे सूत्रसंचालक अभिनेते अमिताभ बच्चन पाय घसरून खाली पडले आणि त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली.
या दुखापतीमुळे अमिताभ बच्चन यांना उभे राहणे अवघड झाले आहे. ‘केबीसी १८’च्या एका भागात खुद्द अमिताभ बच्चन यांनीच आपल्या प्रकृतीबाबत ही माहिती दिली.
अमिताभ बच्चन केबीसीच्या प्रत्येक भागाची सुरुवात मोठ्या उत्साहाने करतात. शो सुरू होताना ते आतुन बाहेर स्टेजवर प्रवेश करतात आणि स्पर्धकांचे स्वागत करतात. नेहमीप्रमाणेच यावेळीही ते शोची सुरुवात करत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.
याबाबत बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, “सहसा मी मंचाच्या मध्यभागी उभे राहून संवाद साधत असतो. पण आज माझ्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. काल शूटिंगदरम्यान माझा पाय घसरला आणि मी खाली पडलो. त्यामुळे माझ्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली.”
स्टुडिओतील प्रेक्षकांना ही माहिती दिल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली. अनेकांनी त्यांची विचारपूस केली. चाहत्यांचे प्रेम पाहून अमिताभ बच्चन म्हणाले की, यामुळे मला नवी ऊर्जा मिळाली आहे. ही दुखापत गंभीर नाही. उभे राहणे जरी अवघड असले तरी मी उभा राहीन. मात्र, सुरुवातीच्या प्रास्ताविक भागाचा संवाद मी बसूनच बोलणार आहे.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी आदल्या दिवसाचा शो पुढे सुरू ठेवत स्पर्धक शौर्य दास यांचे स्वागत केले. शौर्य यांनी २५ लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत यशस्वीरित्या खेळ केला, पण ५० लाख रुपयांच्या प्रश्नात मात्र ते गोंधळात पडले. याबाबत इंडियन एक्स्प्रेसने माहिती दिली आहे.