आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची हॅटट्रिक, तजिंदरपाल सिंगने पाचव्या थ्रोमध्ये डाव पालटत इतिहास रचला
Tajinderpal Toor : भारताचा अनुभवी गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूरने एशियन गेम्समध्ये पुन्हा एकदा पदक पटकावले आहे. पुरुषांच्या शॉट पुटमध्ये त्याने 20.64 मीटरचा थ्रो करत रौप्यपदक जिंकले. विशेष म्हणजे, हे त्याचे एशियन गेम्समधील सलग तिसरे पदक ठरले आहे.

एशियन गेम्समध्ये भारताचा दिग्गज गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूर याने पुन्हा एकदा तिरंगा फडकावला आहे. पुरुषांच्या शॉट पुट प्रकारात आपल्या 5 व्या प्रयत्नात 20.64 मीटर लांब गोळा फेकून त्याने रौप्यपदक पटकावले.
या शानदार कामगिरीसह तजिंदरपालने एशियन गेम्सच्या इतिहासात पदकांची आपली हॅट्रिक पूर्ण केली आहे. यापूर्वी त्याने 2018 (जकार्ता) आणि 2023 (हांगझोऊ) एशियन गेम्समध्ये सलग दोन सुवर्णपदके जिंकली होती.
तूरने सुरुवातीला 20.26 मीटर गोळा फेकला, परंतु तिसऱ्या व चौथ्या प्रयत्नात त्याची कामगिरी २० मीटरपेक्षा कमी राहिली. चार फेऱ्यांनंतर सौदी अरेबियाचा मोहम्मद तोलू (20.48 मीटर) दुसऱ्या स्थानावर असल्याने तूरला कांस्यपदकावर समाधान मानावे लागेल असे वाटत होते.
मात्र 5 व्या प्रयत्नात तजिंदरपालने पूर्ण ताकदीनिशी 20.64 मीटरचा जबरदस्त थ्रो फेकला. या जोरदार थ्रोच्या जोरावर त्याने सौदीच्या खेळाडूला मागे टाकत थेट दुसरे स्थान मिळवून रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
या स्पर्धेत इराणच्या मोहम्मदरेझा तायबी याने 20.81 मीटरचा नवा एशियन गेम्स रेकॉर्ड रचत सुवर्णपदक पटकावले. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत तजिंदरपालने दाखवलेला संयम आणि अनुभव भारताला पदक मिळवून देण्यासाठी मोलाचा ठरला.