
हर्षद चोपडा हा टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. दमदार अभिनय आणि जबरदस्त लूक यांसाठी तो विशेष ओळखला जातो. सध्या त्याची 'बडे अच्छे लगते है' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये तो अभिनेत्री शिवांगी जोशीसोबत मुख्य भूमिका साकारत आहे.

या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतंय. या मालिकेत हर्षद ऋषभची भूमिका साकारतोय. अगदी मालिकेच्या प्रोमोपासून प्रेक्षकांनी त्याच्या भूमिकेला पसंती दर्शविली आहे. टेलिव्हिजनवर त्याला मोठा चाहतावर्ग असल्यामुळेच हर्षदचं मानधनही तगडं आहे.

हर्षद गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत कार्यरत आहे. इतकी वर्षे छोट्या पडद्यावरील विविध लोकप्रिय मालिकांमध्ये काम केल्यानंतर त्याच्या मानधनाचा आकडा चांगलाच वाढला आहे. इतकंच नव्हे तर काही रिपोर्ट्सनुसार, हर्षदची एकूण संपत्ती ही तब्बल 40 ते 50 कोटी रुपयांच्या घरात आहे.

हर्षद एका एपिसोडसाठी जवळपास 60 ते 80 हजार रुपये मानधन घेतो. दर महिन्याला तो किमान 15 लाख रुपये कमावतो. त्यामुळे त्याचं वार्षिक उत्पन्न 2 कोटींच्या घरात आहे.

हर्षदला महागड्या बाइक्सची खूप आवड आहे. त्याच्याकडे दुचाकींचं कलेक्शन आहे. हर्षदने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये 'किस देश में है मेरा दिल', 'तेरे लिए', 'बेपनाह' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय.

हर्षद नुकताच 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत झळकला होता. यामध्ये त्याने अभिमन्यूची भूमिका साकारली होती. आता तो 'बडे अच्छे लगते है' या मालिकेच्या नव्या सिझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेची निर्माती एकता कपूर आहे.

यामध्ये हर्षद एका पंजाबी मुलाच्या आणि शिवांगी दाक्षिणात्य मुलीच्या भूमिकेत आहे. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडतेय. अगदी पहिल्या एपिसोडपासून हर्षद आणि शिवांगीवर प्रेमाचा वर्षाव होत आहे.