
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता गौरव खन्नाने 'बिग बॉस 19'चं विजेतेपद पटकावलं आहे. टॉप 5 मध्ये गौरवसोबत फरहाना भट्ट, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि तान्या मित्तल पोहोचले होते. शेवटच्या दहा मिनिटांत गौरवला सर्वाधिक मतं मिळाली.

विजेता ठरलेल्या गौरवला बक्षिस म्हणून बिग बॉस 19 ची ट्रॉफी आणि 50 लाख रुपयांचा धनादेश मिळाला. शिवाय त्याने बिग बॉसच्या घरात राहून 14 आठवड्यांत बरीच कमाई केली आहे. प्रत्येक आठवड्यासाठी त्याला इतरांच्या तुलनेत सर्वाधिक मानधन मिळत होतं.

जीके म्हणून ओळखला जाणारा गौरव हा चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. सुरुवातीपासूनच तो ट्रॉफीचा प्रबळ दावेदार मानला जात होता. गौरवला प्रत्येक आठवड्यासाठी जवळपास 17.5 लाख रुपये मानधन मिळत होते. म्हणजेच चौदा आठवड्यांमध्ये त्याने तब्बल 2.45 कोटी रुपये कमावले आहेत.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, गौरवची एकूण संपत्ती 15 ते 18 कोटी रुपये इतकी आहे. लिव्हिंग रुममध्ये बसून आरडाओरड करणं, प्रत्येक भांडणात पाऊल ठेवणं किंवा प्रत्येक ठिकाणी आपला वरचष्मा दाखवणं.. यापैकी गौरवने काहीच केलं नाही. याउलट तो शांतपणे, निरीक्षण करत आपला खेळ खेळत राहिला.

याआधी गौरवने 'सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया' या शोचंही विजेतेपद पटकावलं होतं. तर 'अनुपमा' या मालिकेतील अनुज या भूमिकेसाठीही त्याच्यावर प्रेक्षकांकडून भरभरून प्रेमाचा वर्षाव झाला.