
नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या विजयाचा आनंद साजरा करताना चिखलीमध्ये एक आगळावेगळा प्रकार पाहायला मिळाला.

चिखली नगर परिषदेत दुसऱ्यांदा निवडून आलेले भाजपचे नगरसेवक दत्ता सुसर यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क दुधाने अंघोळ घालून जल्लोष साजरा केला. यामुळे बुलढाणा जिल्ह्यात भाजपने दणदणीत विजय मिळवला.

तसेच चिखली नगर परिषदेवरही भाजपचा झेंडा फडकला आहे. दत्ता सुसर यांनी आपल्या प्रभागातून दुसऱ्यांदा विजय मिळवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधीचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली.

त्यानंतर त्यांना दूधाने अंघोळ घालण्यात आली. सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा सुरु आहेत. या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दूधाने अंघोळ घालत असताना कार्यकर्त्यांनी जय श्रीराम आणि भाजपचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. विजयाचा हा दुग्धस्नान सोहळा सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.