
श्री शिर्डी साईबाबांवर देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांची खूप श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटी अनेक भक्त साईबाबांच्या चरणी रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने किंवा इतर वस्तू दान करत असतात. आता याच श्रद्धेतून छत्तीसगड राज्यातील दुर्ग शहरातून आलेल्या एका साईभक्ताने मौल्यवान वस्तू दान केली आहे.

श्रीमती गितीका सहाणी यांनी साईबाबांवरील आपली अढळ भक्ती आणि निस्सीम श्रद्धा व्यक्त करण्यासाठी सोन्याचे फूल अर्पण केले. त्यांनी गुलाबाच्या सुंदर आकाराचे सोन्याचे फूल दान केले आहे.

गुलाबाचे फूल हे प्रेम आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. या विशिष्ट आकाराच्या फुलातून त्यांनी आपली भावना साईचरणी व्यक्त केली आहे. त्यांनी अर्पण केलेले हे सोन्याचे गुलाब फूल १३.१०० ग्रॅम वजनाचे आहे. याची अंदाजे किंमत १ लाख ५४ हजार २५३ रुपये इतकी आहे.

गीतिका सहाणी यांनी साईबाबांच्या चरणी हे मौल्यवान आणि कलात्मक सुवर्ण फूल अर्पण करून त्यांनी आपली भक्ती व्यक्त केली. त्यांच्या या भक्तीभावामुळे साईबाबा संस्थानने त्यांचा आदर करत सत्कार केला.

श्री शिर्डी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे यांच्या हस्ते श्रीमती गितीका सहाणी यांचा सत्कार करण्यात आला. साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या या भाविक महिलेने केलेल्या या भक्तीभावाच्या आणि देणगीच्या माध्यमातून साईबाबांवरील भक्तांची श्रद्धा पुन्हा एकदा दिसून आली आहे.

शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी भक्त नेहमीच मोठी दानं करतात. काही दिवसांपूर्वी इतर भक्तांनीही सोन्याचे हार, मुकुट आणि सोन्याची अक्षरे ॐ साई राम अर्पण केली आहेत. या दानांमुळे साईबाबांच्या झोळीत दिवसेंदिवस मौल्यवान वस्तूंची भर पडत आहे. या घटनेतून साईबाबांच्या भक्तांची आपल्या देवावरील श्रद्धा किती मोठी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध होते.