
लॉकडाऊन दरम्यान अनेक टीव्ही सीरियलचे शूटिंग थांबवण्यात आले होते, तेव्हा रामायण-महाभारत सारखे कार्यक्रम दूरदर्शनवर पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आले होते. या शोजमुळे दूरदर्शनचा टीआरपीही वाढला होता. महाभारतात द्रौपदीची भूमिका अभिनेत्री रूपा गांगुली यांनी साकारली होती.

1988 मध्ये प्रसारित झालेल्या बीआर चोप्रा यांच्या महाभारतात द्रौपदीची भूमिका करून रूपा गांगुली घरोघरी प्रसिद्ध झाल्या. या व्यक्तिरेखेत त्यांचा दमदार अभिनय पाहायला मिळाला. रूपा गांगुली यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1966 रोजी झाला. अभिनेत्री असण्यासोबतच त्या गायिका देखील आहेत.

महाभारतातील एक सीन केल्यानंतर रूपा गांगुली अक्षरशः ढसाढसा रडल्या होत्या. हा सीन म्हणजे द्रौपदीचे वस्त्रहरण. रिपोर्ट्सनुसार, रूपा गांगुली यांनी द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा सीन आपल्या अभिनयाने इतका जिवंत केला की, अभिनेत्री खऱ्या आयुष्यात देखील धायमोकलून रडायला लागली.

रूपा सेटवर इतक्या रडू लागल्या की, निर्माते आणि त्यांच्या सहकलाकारांना त्यांना गप करायला बराच वेळ लागला. एक अभिनेत्री म्हणून, रूपा यांनी हा सीन इतका चांगला साकारला की, तो एकाच टेकमध्ये शूट झाला आणि त्यांना कोणताही रिटेक घ्यावा लागला नाही. याआधी द्रौपदीचे पात्र जुही चावलाला ऑफर करण्यात आले होते.

जुही चावलाचा चित्रपट ‘कयामत से कयामत तक’ द्रौपदीच्या पात्राचे शूटिंग सुरू होण्याच्या तीन महिने आधी प्रदर्शित झाला होता. परंतु, तिने द्रौपदीसाठी करार केला होता. यानंतर जुहीने चोप्राजींना विनंती केली की, तिला आता केवळ चित्रपटातच काम करायचे आहे. त्यानंतर बीआर चोप्रा यांनी करार रद्द केला आणि तिच्या जागी रूपा गांगुली यांची निवड झाली.