
शुक्रवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा शो कौन बनेगा करोडपती 13 शानदार शुक्रवार विशेष भागासाठी अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी यांची उपस्थिती असणार आहे. 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत चालणाऱ्या विशेष दिवाळी सप्ताहासाठी हा कार्यक्रम पणत्या आणि रांगोळीने झगमगलेला असेल, जिथे बिग बी पाहुणे आणि प्रेक्षकांसह मोठ्या उत्साहात हा सण साजरा करताना दिसतील.

शुक्रवारच्या शानदार भागामध्ये, तीन पाहुणे हॉटसीटवर असतील आणि होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक गेम खेळतील. या एपिसोडमधील धमाल आणि खेळ असा ताळमेळ पाहून प्रेक्षकांनाही भुरळ पडेल.

गेम खेळण्याव्यतिरिक्त, अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी शोमध्ये काही मजेदार आणि मनोरंजक क्षण घालवतील.

कतरिना कैफचा 'सूर्यवंशी'च्या सेटची साफसफाई करतानाचा व्हिडीओ दाखवण्यापासून, 'टिप टिप बरसा पानी' गाण्यावर अमिताभ बच्चन आणि कतरिना कैफचा धमाकेदार डान्स आणि अक्षय कुमार चित्रपटात येण्याआधीची कथा हे सगळं अनुभवता येणार आहे.

अमिताभ बच्चन यांच्यासह हे तिघं प्रेक्षकांना मजा, मनोरंजन, हास्य, गेमप्ले आणि बरेच काही देत शोमध्ये मनोरंजनाची मजा वाढवतील. या गेम शोचे होस्ट बिग बी देखील मनोरंजन विश्वातील अक्षय कुमार, रोहित शेट्टी आणि कतरिना कैफ यांच्या कामाचे कौतुक करताना दिसणार आहेत. एवढेच नाही तर रोहित शेट्टी मिस्टर बच्चन यांना रोहितच्या आईसाठी लिहिलेल्या ब्लॉगवर सही करण्याची विनंती करणार आहे. यादरम्यान रोहित त्याच्या वडिलांच्या मिस्टर बच्चनसोबतच्या नातेसंबंधांबद्दल काही अज्ञात गोष्टी देखील उघड करेल.