
मुंबई | 17 मार्च 2024 : महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता गौरव मोरे... कॉमेडीचं टायमिंग आणि त्याची स्टाईल यामुळे अनेकजण गौरव मोरेचे फॅन आहेत. गौरव जितका लोकप्रिय आहे, तितकाच त्याचा इथंपर्यंतचा प्रवास खडतर आहे.

मुंबईतील पवई भागात असणाऱ्या फिल्टर पाडा या भागात लहानाचा मोठा झाला. आज प्रचंड लोकप्रियता, नाव अन् पैसा मिळवल्यानंतरही गौरव मोरे त्याच छोट्या घरात राहतो. त्या मागचं कारणंही तसंच आहे. एका मुलाखतीत गौरव या सगळ्याबाबत बोलता झाला.

फिल्टर पाडा भागातल्या घराने, त्या मातीने मला खूप काही दिलंय. माझ्या बाबांची सुरुवात आणि शेवट याच घरात झाला आहे. आमच्या सगळ्यांचा प्रवास त्या चार भिंतींनी बघितलेला आहे. त्यामुळे त्याचा मान ठेवणं माझं काम आहे. त्यामुळे आजही त्याच घरात राहातो, असं गौरवने एका मुलाखती दरम्यान सांगितलं.

पुढे जास्त पैसा आला तर तिथून बाहेर जाईलही... पण आता ती परिस्थिती आहे की नाही, हे मला माहिती नाही. त्यामुळे सध्या मी तिथेच राहातो, असं गौरव म्हणाला. फिल्टर पाड्यातील माझा जुना मित्र आहे, प्रसन्न... त्यालाच घेऊन मी सगळीकडे जातो. तो माझा कंफर्टझोन आहे, असंही गौरवने सांगितलं.

सामान्य घरातील मुलगा ते प्रसिद्ध अभिनेता असा गौरव मोरेचा प्रवास आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रासोबतच गौरवने सिनेमांमध्येही काम केलं आहे. काही दिवसांआधी आलेला लंडन मिसळ या सिनेमात गौरव अभिनेते भरत जाधव यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर दिसला होता.