
सोनी मराठी वाहिनी नवनवीन मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी नेहमीच सज्ज असते. अभिनेत्री सायली देवधर हिची मुख्य भूमिका असलेली 'वैदेही' - शतजन्माचे आपुले नाते, ही मालिका 16 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

देव दिखाव्याला नाही श्रद्धेला पावतो, असं सांगणार्या या मालिकेत वैदेही ही रामाची निस्सीम भक्त आहे. तिच्या चांगल्या स्वभावामुळे ती दुसऱ्यांना नेहमी मदत करत असते. सालस आणि समंजस स्वभावाची वैदेही आपल्या कुटुंबासाठी, आपल्या बहिणींसाठी नेहमी खंबीर उभी आहे आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी संभाळतेय.

अभिनेत्री सायली देवधर वैदेहीची भूमिका साकारतेय. याआधीही अनेक भूमिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे आणि तिच्या सर्वच भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत.

या मालिकेत अभिनेत्री पल्लवी अजय पाटील आणि तृष्णा चंद्रात्रे यासुद्धा दिसणार आहेत. वैदेहीची मोठी बहीण मनीषा हे पात्र पल्लवी साकारतेय तर वैदेहीच्या लहान बहिणीचं, दिशाचं पात्र तृष्णा साकारतेय. तेजस बर्वे, अभिषेक रहाळकर हे अभिनेतेही या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. आपल्या आधीच्या भूमिकांमधून या दोन्ही अभिनेत्यांनी आपला एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. या मालिकेच्या निमित्ताने या दोघांना पुन्हा छोट्या पडद्यावर काम करताना प्रेक्षक पाहू शकतील.

आत्तापर्यंत मालिकेच्या प्रोमोमधून मालिकेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. प्रोमो प्रेक्षकांना खूप आवडले आहेत आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. प्रोमोमध्ये भर पावसातही लोकांच्या मदतीला जाणारी आणि माणसात देव बघणारी, आपल्या कुटुंबासाठी स्वतःच्या आवडींना मुरड घालणारी आणि स्वतःच्या सुखाचा त्याग करणारी रामभक्त वैदेही यात दिसते आहे.