
नाशिकच्या निफाड तालुक्यातील विंचूर जवळील डोंगरगाव येथे एका घरात थरारक घटना घडली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या परशुराम गुज्जर यांच्या घरातील एका बुटामध्ये तब्बल 2 ते 3 फूट लांबीचा विषारी इंडियन स्पेक्टिकल कोब्रा नाग आढळून आला.

यामुळे डोंगरगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास, गुज्जर यांच्या पाळीव कुत्र्याने जोरजोरात भुंकायला सुरुवात केली. अचानक कुत्रा भुंकायला लागल्याने कुटुंबातील सदस्यांना काहीतरी संशय आला.

त्यांनी घराच्या ओसरीवर ठेवलेल्या बुटांकडे पाहिले. त्यावेळी त्यांना आतमध्ये काहीतरी हालचाल होत असल्याचे जाणवले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ सर्पमित्र आसिफ पटेल यांच्याशी संपर्क साधला.

या घटनेची माहिती मिळताच, आसिफ पटेल तातडीने आवश्यक सुरक्षा साधनांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठ्या कौशल्याने बुटातून त्या विषारी कोब्रा नागाला बाहेर काढले आणि त्याला सुरक्षितपणे पकडले.

त्यानंतर, या नागाला विंचूर एमआयडीसी परिसरातील त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. या घटनेमुळे पावसाळ्यात सापांचा वावर वाढतो हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
