पहिली फ्लाइट उशिरा झाली तर ? कनेक्टिंग फ्लाइट घेताना ताण कमी करायचा असेल तर या 6 गोष्टी विसरूच नका
कनेक्टिंग फ्लाइटने प्रवास करताना विमानतळावरील धावपळ टाळण्यासाठी योग्य नियोजन महत्त्वाचे आहे. इमिग्रेशन, सुरक्षा तपासणी आणि टर्मिनल बदल यांसारख्या प्रक्रिया वेळखाऊ ठरू शकतात. काही टिप्समुळे तुमचा कनेक्टिंग फ्लाइटचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि ताणमुक्त होईल.

कनेक्टिंग फ्लाइटने प्रवास करताना एका विमानातून उतरून दुसऱ्या विमानाच्या गेटपर्यंत पोहोचणे हे अनेकदा आव्हानात्मक ठरू शकते. त्यातच टर्मिनल बदलणे, सुरक्षा तपासणी, इमिग्रेशन आणि सामानाशी संबंधित प्रक्रिया यामुळे प्रवाशांची धावपळ होऊ शकते. विशेषतः दोन फ्लाइट्समधील वेळ कमी असेल, तर काही मिनिटांचा विलंबही तुमच्यासाठी मोठी अडचण निर्माण करू शकतो. मात्र, प्रवासापूर्वी थोडी तयारी केल्यास हा ताण मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. कनेक्टिंग फ्लाइट घेताना खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
इमिग्रेशन आणि सुरक्षा तपासणीची माहिती आधी घ्या- काही आंतरराष्ट्रीय कनेक्टिंग फ्लाइट्समध्ये प्रवाशांना पुन्हा इमिग्रेशन किंवा सुरक्षा तपासणीतून जावं लागू शकतं. त्यामुळे ज्या विमानतळावर फ्लाइट बदलणार आहे, तिथली ट्रान्झिट प्रक्रिया आधीच समजून घ्या. यामुळे किती वेळ लागेल याचा अंदाज घेता येतो आणि शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळता येते.
महत्त्वाची कागदपत्रं जवळ ठेवा - पासपोर्ट, बोर्डिंग पास, व्हिसा आणि इतर आवश्यक कागदपत्रं सहज मिळतील अशा ठिकाणी ठेवा. ही कागदपत्रे चेक-इन सामानात ठेवण्याऐवजी कॅबिन बॅगेत ठेवणे अधिक सुरक्षित आणि सोयीचे आहे. गरज पडताच कागदपत्रे पटकन काढता आली, तर वेळही वाचतो.
टर्मिनल आणि गेट नंबर तपासा - मोठ्या विमानतळांवर एका टर्मिनलमधून दुसऱ्या टर्मिनलमध्ये जाण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. काही विमानतळांवर शटल बस, ट्रेन किंवा अन्य वाहतुकीची सुविधा वापरावी लागू शकते. म्हणून विमानतळावर पोहोचल्यानंतर तुमच्या पुढील फ्लाइटचे टर्मिनल आणि गेट नंबर लगेच तपासा. गेटमध्ये बदल झाला आहे का, हेदेखील पाहा.
एअरलाइनचं ॲप आणि DigiYatra वापरा - तुमच्या फोनमध्ये संबंधित एअरलाइनचं अधिकृत ॲप डाउनलोड करून ठेवा. फ्लाइटची वेळ, गेटमध्ये बदल, विलंब आणि बोर्डिंगसंबंधी अपडेट्स तुम्हाला ॲपद्वारे सहज मिळू शकतात.
आवश्यक वस्तू कॅबिन बॅगेत ठेवा - फ्लाइट लेट होणं किंवा चेक-इन केलेलं सामान उशिरा मिळणं अशा परिस्थिती उद्भवू शकतात. त्यामुळे काही आवश्यक वस्तू नेहमी कॅबिन बॅगेत ठेवा. यामध्ये मोबाइल चार्जर, आवश्यक औषधे, पाण्याची बाटली, हलका नाश्ता आणि गरज पडल्यास बदलण्यासाठी जास्तीचे कपडे यांचा समावेश करू शकता.
दोन फ्लाइट्समधील वेळ काळजीपूर्वक निवडा - तिकीट बुक करण्यापूर्वी दोन्ही फ्लाइट्समधील लेओव्हरचा वेळ नक्की तपासा. वेळ खूप कमी असेल, तर पहिल्या फ्लाइटला थोडा विलंब झाला तरी पुढची फ्लाइट चुकण्याची शक्यता असते. दुसरीकडे, लेओव्हर खूप मोठा असल्यास विमानतळावर बराच वेळ थांबावे लागू शकतं. त्यामुळे पुढील गेटपर्यंत आरामात पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, असा पर्याय निवडणे योग्य ठरेल.
थोडी तयारी, कमी ताण - कनेक्टिंग फ्लाइटचा प्रवास नेहमीच धावपळीचा असेल असं नाही. योग्य नियोजन, आवश्यक कागदपत्रं आणि वेळेची योग्य माहिती असल्यास प्रवास अधिक आरामदायी होऊ शकतो. फ्लाइटची वेळ किंवा गेटमध्ये अचानक बदल झाल्यास घाबरून जाण्याऐवजी एअरलाइनचे अपडेट तपासा आणि त्यानुसार पुढील नियोजन करा. थोडी आगाऊ तयारी केल्यास अनावश्यक तणाव टाळून कनेक्टिंग फ्लाइटचा प्रवास अधिक सुखकर करता येतो.