
ब्रिटन आणि आयरलँड हे दोन देश सध्या 'एओविन' चक्रीवादळाच्या दहशतीखाली आहेत. हे चक्रीवादळ तब्बल 183 किमी वेगानं किनार पट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे.

ब्रिटन आणि आयरलँडमधील हे गेल्या काही वर्षांमधील सर्वात मोठं संकट असल्याचं स्थानिक हवामान विभागाच्या अधिकार्यांनी म्हटलं आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

उत्तर अटलांटिकमध्ये तयार झालेल्या या चक्रीवादळानं अति भयानक रूप घेतलं आहे. त्यामुळे या दोन देशांमध्ये प्रचंड वेगाने वारे वाहणार असून, या वाऱ्याचा वेग ताशी 183 किमीपर्यंत असू शकतो असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

या चक्रीवादळामुळे अति वृष्टीचा इशारा देण्यात आला असून, बर्फ वृष्टीची देखील शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.

चक्रीवादळ एओविनमुळे आयरलँडच्या अनेक भागात अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या या वादळाचा जो वेग आहे, तेवढ्या वेगानं हे वादळ किनार पट्टीवर धडकल्यास प्रचंड नुकसान होणार आहे.

यापूर्वी 2011 मध्ये एवढ्याच तीव्रतेचं वादळ आयरलँडला धडकलं होतं. या चक्रीवादळात प्रचंड नुकसान झालं होतं. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना सुरक्षितस्थळी हलवलं जात आहे.

या वादळामुळे प्रचंड जोरात वारे वाहनार असून, अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बर्फ वृष्टी देखील होणार आहे.