
मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेला चित्रपट ‘दशावतार’ आता छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाचा 21 डिसेंबर 2025 रोजी झी मराठीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.

चित्रपटगृहात प्रचंड यश मिळवल्यानंतर आता घरबसल्या हा अनुभव घेण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘दशावतार’ची कथा कोकणातील पारंपरिक दशावतारी कलाकार बाबुली मेस्त्री यांच्याभोवती फिरते.

वैयक्तिक दु:खामुळे हादरलेल्या मेस्त्रींच्या आयुष्यात खाण प्रकल्पामुळे गावावर आलेले संकट, अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि मुलाच्या मृत्यूमागील सत्याचा शोध अशा अनेक थरांचा प्रवास उलगडत जातो.

लोककला, श्रद्धा आणि आधुनिक वास्तव यांचा संगम साधत, बाबुली मेस्त्रींची शेवटची दशावतारी कामगिरी चांगल्या आणि वाईटातील थरारक लढाई ठरते. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदलकर, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या निमित्ताने झी मराठी मालिकांमधील कलाकार ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील सिद्धू, जयंत, संतोष आणि वेंकी, ‘तारिणी’ मालिकेतील केदार, ‘वीण दोघातली ही तुटेना’ मधील रोहन, ‘सावळ्याची जणू सावली’ मधील सारंग, तसेच ‘कमळी’ मालिकेतील हृषी हे सर्व कलाकार ‘दशावतार’मधील विविध अवतारांमध्ये दिसले.

त्यांच्या या उपक्रमामधून चित्रपटाबद्दलचा उत्साह आणि आदर स्पष्टपणे जाणवला. या सर्व कलाकारांची रंगभूषा केली ती म्हणजे 'दादा राणे कोनस्कर' आणि 'उदय राणे कोनस्कर' यांनी, त्यांची सेटवरील उपस्थिती हा क्षण आणखी खास बनवणारी ठरली.

खऱ्या आयुष्यातील दशावतारी नाटकांचे दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शक दादा राणे कोनस्कर आणि उदय राणे कोनस्कर गेली 34 वर्षे दशावतारी रंगभूमीवर कार्यरत आहेत. तसेच या दोघांनी आजपर्यंत 7000 पेक्षा अधिक प्रयोगांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.