
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये अभिनेता आर. माधवनने मास्टरमाईंड अजय सन्यालची भूमिका साकारली आहे. ही भूमिका राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या आयुष्यावरून प्रेरणा घेऊन साकारण्यात आली आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज'मधील आर. माधवनचे सर्व सीन्स दमदार आहेत. हमजाच्या मिशनचं मार्गदर्शन तो करत असतो. अजय सन्याल बनलेल्या आर. माधवनसोबतच त्याच्या ऑनस्क्रीन पत्नीनेही प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे.

'धुरंधर 2'मध्ये अभिनेत्री जान्हवी बंसलने अजय सन्यालच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात जान्हवीचे फक्त दोनच सीन्स आहेत. तरीसुद्धा त्या दोन सीन्समध्ये तिने आपल्या अभिनयकौशल्याची जबरदस्त छाप सोडली आहे. चाहते तिला थिएटरमधून तिचे क्लिप्स पाठवत असल्याचा खुलासा जान्हवीने केला आहे.

जान्हवी बंसल पंजाबी सिनेसृष्टीत कार्यरत आहे. तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नव्हे तर काही भूमिकांसाठी तिने पुरस्कारसुद्धा जिंकले आहेत. त्यामुळे चाहत्यांनी जेव्हा तिला 'धुरंधर 2'मध्ये पाहिलं, तेव्हा ते खुश झाले.

जान्हवीने सेटवरील काही फोटोसुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. 'धुरंधर 2'मधील पूजेचा सीन हा महाशिवरात्री रोजी शूट झाल्याचं तिने सांगितलं. या सीनमध्ये महामृत्युंजयचा जो जप करण्यात आला, तो खराखुरा होता, असंही ती म्हणाली.

"सेटवरचं वातावरण धार्मिक झालं होतं. यादरम्यान आदित्य धरसुद्धा त्याचं दिग्दर्शनाचं काम करत होता. मला सेटवरील वातावरण खूप आवडलं होतं आणि या भूमिकेमुळे जी ओळख मिळतेय, त्यानेही मी फार खुश आहे", अशा शब्दांत जान्हवी व्यक्त झाली.