Dhurandhar 2: ओटीटीवरही ‘धुरंधर 2’ मालामाल; हमजासाठी कोट्यवधींची डील
रणवीर सिंह आणि सारा अर्जुन यांचा 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट एक महिन्यानंतरही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 1750 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.

रणवीर सिंहच्या 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अद्याप दमदार कमाई करत आहे. आता ओटीटी रिलीजसाठी निर्मात्यांनी कोट्यवधी रुपयांची डील केल्याची माहिती समोर येत आहे.

'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एका मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मशी कोट्यवधींची डील केली आहे. परंतु या चित्रपटाला ओटीटीवर पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी जवळपास महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला स्ट्रीम होऊ शकतो.

या चित्रपटाचे डिजिटल राइट्स जियो हॉटस्टारने विकत घेतले आहेत. ही डील तब्बल 150 कोटी रुपयांमध्ये निश्चित झाल्याचं समजतंय. कोणत्याही हिंदी चित्रपटासाठी ही सर्वांत मोठया डिजिटल डिल्सपैकी एक आहे. याआधी धुरंधरचा पहिला भाग नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला होता. आता दुसऱ्या भागासाठी डिजिटल रिलीजच्या रणनितीत बदल केल्याचं पहायला मिळतंय.

एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर सर्वसाधारणपणे 28 दिवसांनंतर ओटीटीवर स्ट्रीम होतो. परंतु 'धुरंधर 2'चं यश आणि कमाई पाहता निर्माते आणखी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी घेऊ शकतात. हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसरवर दररोज कोट्यवधींची कमाई करत आहे. जगभरातील कमाईच्या बाबतीत 'धुरंधर 2'ने 'पुष्पा 2'लाही मागे टाकलं आहे.

गुढीपाडवा आणि ईदच्या सुट्ट्यांचा फायदा घेत या चित्रपटाने जगभरातील ओपनिंग कलेक्शनचे सर्व विक्रम मोडले. ‘धुरंधर 2’ने शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि यशच्या ‘केजीएफ चाप्टर 2’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांपेक्षा जास्त कमाई केली.