
बऱ्याचदा, गारुड्याचा खेळ आपण लहानपणी पाहिला असेल. गारुड्याने पुंगी वाजवताच साप/ नाग त्या तालावर डोलायला लागायचा. हे पाहण्यासाठी, शेकडो लोक त्या गारुड्याभोवती गर्दी करायचे. लोकांना सापाचे ते डोलणारे नृत्य पाहून नक्कीच आश्चर्य वाटायचं.

पण अनेकांना हा प्रश्न पडतो की सापांना कानच नसतात मग ते या पुंगीच्या आवाजाने डोलू कसे लागतात. ते खरंच त्या पुंगीच्या तालावर नाचतात का? नेमकं सत्य काय आहे हे जाणून घेऊयात .

तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये सापांना पुंगीच्या तालावर नाचताना पाहिले असेल, पण प्रत्यक्ष जीवनात असे काहीही घडत नाही. सापांना/ नागाला कान नसतात, त्यामुळे त्यांची ऐकण्याची क्षमता खूपच मर्यादित असते. साप त्याच्या डोळ्यांनी गारुडीच्या हालचाली पाहतो आणि जसजसा तो आपले शरीर हलवतो तसतसा तो देखील त्याच्या तालावर डोलू लागतो.

तसेच असेही म्हटले जाते की गारुडीच्या पुंगीच्या आवाजाचे व्हायब्रेशन जाणवते. त्या आवाजाची कंपने त्याला जाणवतात.त्यामुळे जेव्हा गारुडी पुंगी वाजवताना थोडासा डोलत असतो त्या पुंगीतून येणाऱ्या आवाजाच्या व्हायब्रेशन जसे जसे जाणवते तसा साप/ नागही डोलू लागतो.

सापांना/ नागाला कान नसतात, पण तरीही ते त्यांच्या सभोवतालच्या हालचाली जाणवू शकतात. साप त्यांच्या त्वचेवर येणाऱ्या कंपनांवरून हालचाली ओळखू शकतात. म्हणून, कोणी जवळ आल्यावर ते लगेच सावध होतात. तसेच असंख्य अभ्यासातून असे दिसून आले आहे की साप कोणत्याही प्रकारच्या आवाजाकडे, विशेषतः बासरीच्या किंवा पुंगीच्या आवाजाकडे आकर्षित होत नाहीत.