
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्य 'अमेरिका फस्ट' या धोरणामुळे संपूर्ण जगात व्यापारविषयक अस्थिरता आहे. सगळेच देश स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करत असून अमेरिकेला पर्याय म्हणून वेगळी बाजारपेठ शोधत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांच्या विरोधात टॅरि अस्त्र बाहेर काढलेले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाची कोंडी व्हावी, तसेच भारतासोबतची व्यापारविषयक तूट भरून निघावी यासाठी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. याचा भारताला चांगलाच फटका बसला. दरम्यान, अन्य काही देशांवरदेखील ट्रम्प यांनी अशाच प्रकारे कमी-अधिक प्रमाणात टॅरिफ लावलेला आहे.

दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला चांगलेच धमकावले आहे. त्यांनी कॅनडावर थेट 100 टक्के टॅरिफ लावण्याचा थेट इशाराच देऊन टाकला आहे. ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर आता कॅनडा हा देश चांगलाच हादरला आहे.

कॅनडा हा देश चीनसोबत ट्रेड डील करत असेल तर आम्ही कॅनडावर थेट 100 टक्के टॅरिफ लावू असे ट्रम्प म्हणाले आहेत. एका आठवड्यापूर्वी कॅनडाचे पंतप्रधान चीनच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या काही दिवसांनी ट्रम्प यांनी कॅनडाला ही धमकी दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे अगोदरपासूनच कॅनडाच्या धोरणावर नाराज आहेत. कॅनडा हे अमेरिकेचे 50 वे राज्य असावे, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. असे असतानाच आता ट्रम्प यांनी कॅनडाला 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.