
असा बनवा हलवा अरबियन स्टाईलचा गोड हलवा घरच्या घरी अगदी झटपट तयार करता येतो. सर्वप्रथम 1 लिटर दूध उकळायला ठेवा. एका वाटीत थोड्या थंड दुधात अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर नीट गाठी न राहू देता मिसळा आणि ते मिश्रण उकळत्या दुधात हलवत राहा. त्यानंतर आवडीनुसार 1-2 चमचे कस्टर्ड पावडर घालून सतत ढवळत राहा. गोडीसाठी साखर किंवा कंडेन्स्ड मिल्क मिसळा आणि सुगंधासासाठी थोडे व्हॅनिला इसेन्स टाका. मिश्रण घट्ट होऊन रबडीसारखी कन्सिस्टन्सी येईपर्यंत शिजवा. आता ब्रेडच्या कडा कापून एका डब्यात किंवा ट्रेमध्ये एक थर लावा. त्यावर तयार केलेले घट्ट दूध पसरवा आणि वरून बदाम, काजू, पिस्ता आदी सुकामेवा भुरभुरा. अशा प्रकारे दोन-तीन थर तयार करा. शेवटी गुलाबाच्या पाकळ्यांनी सजावट करा. हा गोड हलवा लगेच सर्व्ह केला तरी छान लागतो किंवा थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून थंडगार करूनही देता येतो.

झटपट तयार होणारे नारळाचे लाडू झटपट तयार होणारे नारळाचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम किसलेला सुक्या नारळाचा भुगा मंद आचेवर थोड्या तुपात हलका परतून घ्या. हलकीशी छान सुगंध येऊ लागली की गॅस बंद करा जास्त भाजू नका, नाहीतर रंग बदलू शकतो. आता कढईत कंडेन्स्ड मिल्क, मिल्क पावडर आणि चिमूटभर वेलची पूड घालून मंद आचेवर हलवत शिजवा. मिश्रण घट्ट होऊन कढईच्या कडांना सुटू लागले की गॅस बंद करा. त्यात आधी परतलेला नारळ घालून चांगले एकजीव करा. मिश्रण थोडे कोमट असतानाच हाताला हलके तूप लावून छोटे-छोटे लाडू वळा. शेवटी बाजूला ठेवलेला कोरडा नारळ त्यावर घोळवून कोटिंग करा. तयार झालेले नारळाचे मऊसर, सुगंधी लाडू लगेच वाढू शकता किंवा हवाबंद डब्यात साठवू शकता.

चविष्ट फ्रूट क्रीम चविष्ट फ्रूट क्रीम तयार करण्यासाठी सर्वप्रथम व्हिपिंग क्रीममध्ये कंडेन्स्ड मिल्क किंवा साखर घालून ते मिश्रण हँड व्हिस्क किंवा इलेक्ट्रिक बीटरने छान फेटून घ्या. मिश्रण हलके, मऊ आणि फेसाळसर होईपर्यंत फेटणे महत्त्वाचे आहे. यानंतर सफरचंद, हिरवी-काळी द्राक्षे, डाळिंबाचे दाणे, कीवी, स्ट्रॉबेरी, आंबा, केळी असे आवडीचे फळांचे छोटे तुकडे करून त्यात मिसळा. तयार फ्रूट क्रीम लगेच सर्व्ह करू शकता किंवा थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवून थंडगार करूनही देता येते. चव वाढवण्यासाठी थोडे मिक्स फ्रूट इसेन्स किंवा व्हॅनिला इसेन्स घालू शकता. मात्र खूप पाणी सुटणारी फळे जसे खरबूज किंवा टरबूज टाळावीत, नाहीतर क्रीम पातळ होऊ शकते.

स्वादिष्ट पेढा रोल झटपट आणि स्वादिष्ट पेढा रोल घरी सहज बनवता येतो. सर्वप्रथम 8-10 काजू, हिरवी वेलची आणि साखर एकत्र करून बारीक पूड करून घ्या. त्यानंतर नारळाचा किस मिक्सरमध्ये फिरवून तोही बारीक करा. आता एका भांड्यात काजू-साखरेची पूड, नारळाची पूड आणि मिल्क पावडर एकत्र मिसळा. त्यात थोडेथोडे कोमट उकळलेले दूध घालत मऊसर गोळा तयार करा. चव आणि मऊपणासाठी 1-2 चमचे साजूक तूप मिसळा. तयार गोळ्याचा लांबट रोल बनवा आणि हव्या त्या आकारात तुकडे कापा. वरून चांदीचा वर्ख आणि बदाम काप घालून सजवा. तयार पेढा रोल सर्व्ह करण्यास सज्ज

इफ्तारसाठी खास शाही टुकडा इफ्तारसाठी खास शाही टुकडा बनवायचा असेल तर प्रथम ब्रेडचे आवडीप्रमाणे गोल, चौकोनी किंवा त्रिकोणी तुकडे करा. हे तुकडे साजूक तुपात छान सोनेरी रंग येईपर्यंत तळा किंवा हलक्या तुपात शॅलो फ्राय करा. दुसरीकडे दूध उकळायला ठेवा आणि त्यात चवीनुसार साखर मिसळा. थोड्या थंड दुधात 4-5 चमचे कस्टर्ड पावडर गाठी न राहू देता कालवून ते उकळत्या दुधात घाला. मिश्रण लवकरच घट्ट होईल. सर्व्ह करताना तळलेले ब्रेडचे तुकडे ताटात मांडून त्यावर घट्ट केलेले दूध ओता. वरून पिस्त्याचे काप, बदाम-काजू तुकडे आणि वेलची पूड भुरभुरा. वेगळ्या पद्धतीने द्यायचे असल्यास तळलेले ब्रेड आधी साखरेच्या पाकात हलके बुडवून घ्या, नंतर ताटात ठेवून गरम केलेला मावा वर पसरवा. अशा प्रकारे तयार केलेला शाही टुकडा इफ्तारसाठी समृद्ध आणि स्वादिष्ट पर्याय ठरतो.