
देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह अजूनही कायम आहे. गेल्या २७ ऑगस्ट रोजी बाप्पांचं आगमन झाल्यानंतर सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

सलग १० दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान सर्वच भक्त बाप्पांची मनोभावे पूजा करतात. त्यांना विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण करतात. पण आता लवकरच बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे.

यंदा शनिवारी ६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी असल्याने या दिवशी सर्वाधिक बाप्पांचे विसर्जन होणार आहे. त्यानंतर गणपती विसर्जन करून गणेशोत्सवाची सांगता होईल.

बहुतांश घरात आणि मंडळात दीड दिवस, तीन, पाच, सात किंवा दहा दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान असतात. तुम्हालाही कधीतरी हा प्रश्न पडला असेल की, गणपती बाप्पाचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीच्या दिवशीच का होतं? आज आपण यामागे दडलेली एक रंजक आणि पौराणिक कथा जाणून घेणार आहोत.

फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. महर्षी वेद व्यास यांनी महाभारताची कथा लिहिण्यासाठी आपल्या सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पांची निवड केली होती. पण वेद व्यास यांची एक अट होती. त्यांनी सांगितलं, "गणपती बाप्पा, मी तुम्हाला जी कथा सांगेन, ती तुम्ही मध्येच थांबता कामा नये. तुम्ही सलग लिहित राहिलं पाहिजे!"

बाप्पांनी ही अट लगेचच मान्य केली, पण त्यांनीही एक छोटीशी अट घातली. ते म्हणाले, मी एकही क्षण न थांबता लिहीन, पण तुम्हीही कथा सांगणं मध्येच थांबवू नये." वेद व्यास यांनीही ही अट आनंदाने स्वीकारली.

अशा प्रकारे, महाभारत लिहिण्याचा महान प्रवास सुरू झाला. वेद व्यास कथा सांगत होते. बाप्पा ती वेगाने आपल्या लेखणीने लिहित होते. अनेक दिवस गेले, रात्र सरल्या, असं करता करता १० दिवस उलटून गेले.

दहाव्या दिवशी ही कथा पूर्ण झाली. बाप्पांनी न थांबता, न थकता महाभारत लिहिलं. पण, या सलग १० दिवसांच्या लिखाणामुळे बाप्पांच्या शरीरातून खूप उष्णता बाहेर पडू लागली. त्यांची लेखणी वेगाने चालत होती. त्यामुळे त्यांच्या शरीराचं तापमान प्रचंड वाढलं होतं.

जेव्हा लिखाण पूर्ण झालं, तेव्हा वेद व्यास यांनी बाप्पांच्या शरीराला हात लावून पाहिलं. बाप्पांचं शरीर खूप गरम झालं होतं. आपल्या प्रिय शिष्याची ही अवस्था पाहून वेद व्यास यांना वाईट वाटलं. त्यांनी बाप्पांना शांत आणि थंड करण्यासाठी एक युक्ती सुचवली.

यावेळी वेद व्यासांनी गणपती बाप्पांना जवळच्या पाण्यात घेऊन जाऊन डुबकी मारायला लावली. या डुबकीने बाप्पांच्या शरीराला खूप आराम मिळाला. त्यांना थंडावा वाटला. ज्या दिवशी बाप्पांनी पाण्यात डुबकी मारली तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता.

तेव्हापासून अशी परंपरा सुरू झाली की भक्तांनी १० दिवस बाप्पांची मनोभावे पूजा करायची. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांचं विसर्जन करायचं. ही एक प्रकारे बाप्पांना त्यांच्या कठोर तपश्चर्येनंतर शीतलता देण्याची आणि त्यांना आराम देण्याची पद्धत आहे.

म्हणूनच, आपण अनंत चतुर्दशीला बाप्पांना निरोप देतो. ही केवळ विसर्जनाची प्रक्रिया नाही, तर १० दिवसांच्या सेवेनंतर बाप्पांना शांत आणि शीतल करण्याची एक सुंदर परंपरा आहे.