
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओ ही सरकारची फारच चांगली आणि कर्मचाऱ्यांना उतार वयात आर्थिक स्थैर्य देणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून कर्मचारी प्रत्येक महिन्याला थोडे-थोडे पैसे जमा करून निवृत्तीनंतरच्या आयुष्याची तजवीज करतात.

या योजनेत कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला काही रक्कम गुंतवावी लागते. हे पैसे कर्मचाऱ्याच्या पगारातून कापले जातात. हेच जमा झालेले पैसे तुम्ही निवृत्तीनंतर काढू शकता. तुम्ही या रकमेला पेन्शनच्या रुपातही घेऊ शकता.

तुम्हाला आताच नोकरी लागली असेल तर याच योजनेच्या माध्यमातून तुम्ही करोडपती होऊ शकता. समजा तुम्ही भविष्यात एकूण 30 वर्षे जरी नोकरी केली, तरी तुमचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

तुम्ही तुमच्या पीएफ खात्यात तुमच्या पगाराच्या एकूण रकमेपैकी 7200 रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवले तर तुमचा 30 वर्षांनी तब्बल 1.10 कोटी रुपयांचा फंड जमा होऊ शकतो.

विशेष म्हणजे तुमच्या या जमा केलेल्या रकमेवर सरकार तुम्हाला 8.25 टक्क्यांनी व्याजही देते. तुम्ही पीएफमध्ये गुंतवलेली रक्कम पेन्शन म्हणूनही मिळवू शकता. तुमच्या पीएफ खात्यात तुमची कंपनी तुमच्या बेसिक सॅलरी आणि महागाई भत्त्याच्या 12 टक्क्यांनी पैसे टाकत असते.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)