भारतातलं मीट फ्री शहर, मांस विकणंही गुन्हा, प्रयत्न केला की थेट कारवाई, नाव काय?
या साधूंनी उपोषण करत पवित्र तीर्थक्षेत्राच्या परिसरात मांसविक्री थांबवण्याची मागणी केली.या आंदोलनामुळे पालितानातील मांसाहाराच्या मुद्द्याने देशभरात लक्ष वेधून घेतले आणि अखेर सरकारने निर्बंध लागू केले.

या जगात कोट्यवधी लोक मांसाहार करतात. भारतातही मांसाहार करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. परंतु याच भारतात असे एक शहर आहे, जिथे मांसविक्री करण्यावर बंदी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या नियमाचे पालन केले जाते.
गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील पालिताना हे जैन धर्मीयांसाठी पवित्र शहर मानले जाते. 2014 साली या शहरात मांस, मासे आणि अंड्यांची विक्री तसेच प्राण्यांची कत्तल करण्यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे पालितानाची ओळख जगातील अनोख्या ‘मीट-फ्री’ शहरांपैकी एक म्हणून झाली.
पालिताना परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या कत्तलखान्यांना विरोध करण्यासाठी सुमारे 200 जैन साधूंनी आंदोलन केले होते. या साधूंनी उपोषण करत पवित्र तीर्थक्षेत्राच्या परिसरात मांसविक्री थांबवण्याची मागणी केली.या आंदोलनामुळे पालितानातील मांसाहाराच्या मुद्द्याने देशभरात लक्ष वेधून घेतले आणि अखेर सरकारने निर्बंध लागू केले.
बंदी लागू झाल्यानंतर पालिताना शहरात मांस, मासे आणि अंडी विकण्यावर निर्बंध आले. प्राण्यांची कत्तल करण्यावरही कायदेशीर बंदी घालण्यात आली. त्यामुळे येथे शाकाहार हा केवळ वैयक्तिक आहाराचा पर्याय न राहता स्थानिक नियमांचा भाग बनला आहे.
पालितानातील या निर्णयावरून खाद्यपदार्थ निवडण्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याबाबतही चर्चा झाली. काही नागरिक, व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्रातील लोकांनी अशा निर्बंधांमुळे व्यवसाय आणि रोजगारावर परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा उपस्थित केला. धार्मिक श्रद्धा, सार्वजनिक नियम आणि व्यक्तीच्या आहाराच्या स्वातंत्र्याचा समतोल यावरून पालितानाचा निर्णय आजही चर्चेचा विषय ठरतो.