
आज गुरुपौर्णिमा... यानिमित्ताने शिर्डीमध्ये सध्या गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जात आहे. सध्या भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. साईबाबांना आपले गुरु मानणारे हजारो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत.

कालपासूनच या तीन दिवसीय उत्सवाला सुरुवात झाली आहे. सध्या मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी केली जात आहे. शिर्डीत सुरु झालेल्या या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवासाठी तीन लाखांहून अधिक भाविक साईदर्शनासाठी दाखल झाले आहेत.

साईबाबा संस्थानने भाविकांच्या सोयीसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये दर्शन, राहण्याची सोय आणि भोजनाची उत्तम व्यवस्था समाविष्ट आहे. मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

साईनामाचा जयघोष करत अनेक पायी पालख्या देखील शिर्डीत दाखल झाल्या आहेत. भाविकांसाठी 160 क्विंटल लाडू प्रसाद आणि 60 क्विंटल बुंदी तयार करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, साई प्रसादालयात भोजनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

साईभक्तांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, संस्थानची आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. साई संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्सवाकरिता येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, याची पूर्ण काळजी घेतली जात आहे.