Hair Fall : केसगळतीमागे असू शकते हे मोठे कारण; अनेक लोक करतात दुर्लक्ष
आजकाल अनेकांना केसगळतीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. खराब आहार, ताणतणाव आणि बदलती जीवनशैली यामुळे केस गळतात, असे अनेकांना वाटते. मात्र, शरीरातली काही दुखणे लोक दुर्लक्षीत करतात. त्यामुळे केसांची काळजी घेताना पोटाच्या आरोग्याकडे लक्ष देणेही महत्त्वाचे आहे.

आतड्यांमध्ये सूज, लीकी गट सिंड्रोम किंवा गट मायक्रोबायोमचे असंतुलन असल्यास शरीरातील पोषक घटकांचे शोषण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले आयर्न मिळण्यात अडचण येऊ शकते. आयर्नची कमतरता केसांच्या आरोग्यावर परिणाम करून केसगळती वाढवू शकते.
आयर्न, झिंक, बायोटिन आणि व्हिटॅमिन D यांची कमतरता केसगळतीचे कारण ठरू शकते. त्यामुळे आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि ताज्या भाज्यांचा समावेश करा. नट्स आणि सीड्स खाल्ल्याने झिंक मिळण्यास मदत होते.
व्हिटॅमिन D मिळवण्यासाठी दररोज 20 मिनिटे सूर्यप्रकाशात बसण्याचा सल्ला दिला जातो. योग्य आहारातूनही शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. त्यामुळे संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.
आतडे आणि कोलनच्या आरोग्यासाठी आहारात त्रिफळा पावडरचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे
महागड्या शॅम्पू आणि हेअर केअर उत्पादनांसोबत शरीराच्या अंतर्गत आरोग्याकडेही लक्ष द्या. योग्य आहार आणि पोषक घटक केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. केसगळती जास्त असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. (डिस्क्लेमर: या लेखातील माहिती सामान्य माहितीसाठी आहे. आहारात बदल करण्यापूर्वी किंवा कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)