संपूर्ण टीमने ऐनवेळी घेतली माघार, ओटीटीने नाकारलं; आज त्याच चित्रपटाने पार केला 300 कोटींचा टप्पा
Hanuman Ansh Box Office Collection: अवघ्या दोन कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल कामगिरी केली आहे. प्रदर्शनाच्या 41 व्या दिवशी या चित्रपटाने मोठा टप्पा पार केला आहे.

बॉलिवूडमध्ये मोठ्या स्टार्सच्या आणि कोट्यवधींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटांची नेहमीच चर्चा होते. मात्र सध्या एक छोट्या बजेटचा अध्यात्मिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठ्या चित्रपटांना टक्कर देत आहे. हा चित्रपट दुसरा तिसरा कोणता नसून 'हनुमान अंश' आहे. या चित्रपटाने जगभरातील कमाईत 300 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या सुमारे 1.75 ते 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने ही कामगिरी केली आहे. ‘हनुमान अंश’ 7 ऑगस्ट 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये या चित्रपटाला अपेक्षित प्रेक्षकसंख्या मिळाली नाही. त्यामुळे हा चित्रपट लवकरच थिएटरमधून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, हळूहळू प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे चित्रपटाच्या कमाईला वेग आला.
वर्ड ऑफ माउथ, पब्लिसिटीचा या चित्रपटाला सर्वाधिक फायदा झाला. तिसऱ्या आणि त्यानंतरच्या आठवड्यांमध्ये चित्रपटाच्या शोची संख्या वाढली आणि कमाईतही मोठी वाढ झाली. चित्रपटाने 41व्या दिवशी जगभरात 300.25 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली. त्यापैकी भारतातील ग्रॉस कलेक्शन सुमारे 280 कोटी रुपये, तर परदेशातील कमाई 20.25 कोटी रुपये आहे.
‘हनुमान अंश’ची कथा उत्तराखंडमधील प्रसिद्ध संत नीम करोली बाबा यांच्या जीवन आणि शिकवणीपासून प्रेरित आहे. विशाल चतुर्वेदी यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात शोभिनव सत्य यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत विहान शेडगे, चंदन के. आनंद, पूर्णिमा तिवारी, अनिल रस्तोगी, गुलशन पांडे आणि भागवदास पटेल हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
चित्रपटाच्या 300 कोटींच्या यशानंतर आता त्याच्या पुढील भागाबाबतही चर्चा सुरू झाली आहे. ‘हनुमान अंश’ची कथा तीन भागांमध्ये पुढे नेण्याची योजना असल्याचं वृत्त आहे. दुसऱ्या भागात नीम करोली बाबांच्या प्रभावाशी संबंधित काही प्रसिद्ध व्यक्तींच्या कथा दाखवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.