
ताक हे कॅल्शियम, प्रथिने आणि व्हिटॅमिन बी12 सारख्या पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. तसेच ते एक प्रोबायोटिक आहे. म्हणून, ताक पिणं हे आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. तज्ञांकडून त्याचे फायदे आणि किती प्रमाणात प्यावे हे जाणून घेऊया.

जयपूरच्या आहारतज्ज्ञ मेधावी गौतम म्हणाल्या की, ताक हे प्रोबायोटिक असून त्यात असलेले चांगले बॅक्टेरिया आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यात भरपूर कॅल्शियम असतं जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. यासोबतच, ताक शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं.

तज्ञांच्या सांगण्यानुसार, दोन जेवणांच्या दरम्यान ताक घेणे चांगले असते. सकाळी 11:30 किंवा संध्याकाळी 4:30च्या सुमारास ताक पिणं चांगलं असतं. ते दुपारच्या जेवणासोबत किंवा नंतर पिता येऊ शकतं. तसेच ते पिणे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर आणि गरजेवर अवलंबून असते.

जयपूरच्या आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, एक सामान्य व्यक्ती दिवसातून 200 ते 300 ग्रॅम म्हणजेच 1 ग्लास ताक सहज पिऊ शकते. ताक दुपारच्या जेवणासोबत पिणे चांगले. तसेच, ताक पिताना ताजे असावे आणि जास्त आंबट नसावे.

ताक चविष्ट आणि पौष्टिक बनवण्यासाठी त्यात अनेक गोष्टी घालता येतात. जसे की ताकात किसलेली काकडी मिसळून पिणे, याशिवाय बहुतेक लोक काळे मीठ आणि जिरे पावडर मिसळून ताक पितात. त्यात ओवा देखील घालता येतो.