
पनवेल आणि कर्जत हा एकेरी मार्ग असून यावरुन मालगाड्या आणि काही लांबपल्ल्याच्या गाड्या धावत असतात. मात्र या मार्गाचे दुहेरीकरणाचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळ MUTP-III अंतर्गत करीत असून ते अंतिम टप्प्यात आले आहे.

मध्य रेल्वेच्या या नव्या उपनगरीय मार्गाच्या बांधकामासाठी २७८२ कोटी खर्च मंजूर झाला आहे. या प्रकल्पाचे फिजिकल वर्क जवळपास ८० टक्क्यांहून अधिक झाले आहे.

या कॉरिडॉरमध्ये पनवेल आणि कर्जत दरम्यान एक डेडीकेटेड दुहेरी उपनगरीय मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई, रायगड जिल्हा आणि जवळच्या विकास केंद्रांसाठी कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.

हा पनवेल आणि कर्जत कॉरिडॉर एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, सध्याच्या उपनगरीय नेटवर्कवरील ताण कमी होणार असून हजारो प्रवाशांचा रोजचा प्रवास वेळ कमी होईल अशी अपेक्षा आहे. खाजगी, सरकारी आणि वनजमिनीसह या प्रकल्पासाठीची संपूर्ण जमीन संपादन पूर्ण झाले आहे.

बांधकाम: भूमिगत पुल , मोठे आणि लहान पूल आणि बोगदे यांचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले आहेत. तीन बोगद्यांचे काम प्रगतीपथावर आहे आणि अर्थ वर्क जवळपास पूर्ण होत आले आहे.

पनवेल आणि कर्जत मार्गाच्या रेल्वे उड्डाणपुलांचे बांधकाम सुरू आहे, बहुतेक गर्डरचे लाँचिंग झाले आहेत आणि डेक स्लॅबचे काम सुरू आहे. पनवेल, चिखले, मोहपे, चौक आणि कर्जत येथील स्थानक इमारती आणि प्रवासी सुविधा पूर्ण होण्याच्या टप्प्यात आहेत. बुकिंग ऑफिस, सर्क्युलेशन एरिया, स्टाफ क्वार्टर, फूट ओव्हरब्रिज आणि उपनगरीय इमारती यासारख्या अनेक सुविधा आधीच कार्यान्वित झाल्या आहेत.

ट्रॅक, ओएचई आणि कामे : बॅलास्ट फॉर्मेशन आणि रेल्वे पॅनेल अनलोडिंगद्वारे अनेक विभागांमध्ये ट्रॅक लिंकिंगचे काम प्रगतीपथावर आहे. सध्या यार्ड रीमॉडेलिंग, प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट आणि सीओपी फाउंडेशनचे काम सुरु आहे. सिग्नलिंग आणि टेलिकॉम: मोहोपे आणि चौक येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.

पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉर हा प्रकल्प रायगडला मुंबईला जोडण्यासाठी एक परिवर्तनकारी प्रकल्प आहे. तो पूर्ण झाल्यानंतर सध्याच्या उपनगरीय मार्गांवरील भार कमी होईल आणि नवी मुंबई आणि रायगडमधील प्रवाशांना फायदा होईल.