
अनेकदा घाईघाईत आपल्याकडून महत्त्वाचे फोटो डिलीट होतात. फोटो डिलिट झाल्यावर आता ते परत कधी मिळणार नाही असे आपल्याला वाटते. पण तसं अजिबात नाही. हल्ली बऱ्याच अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये काही सोपे पर्याय उपलब्ध झाले आहेत. ज्याद्वारे तुम्ही तुमचे फोटो सहज परत मिळवू शकता.

तुम्ही फोटो डिलीट केल्यावर तो लगेच कायमचा डिलिट होत नाही. तो एका खास फोल्डरमध्ये स्टोअर केला जातो. अँड्रॉईड फोनमध्ये या फोल्डरला Trash किंवा Bin म्हणतात. तर iPhone या फोल्डरला Recently Deleted असे नाव असते. या ठिकाणी तुमचे फोटो साधारण ३० दिवसांपर्यंत सुरक्षित असतात. तुम्ही तिथे जाऊन ते Restore करू शकता.

जर तुमच्या फोनमध्ये गुगल फोटोज ॲप असेल आणि बॅकअप सुरू असेल, तर डिलीट केलेले फोटो ६० दिवसांपर्यंत ट्रॅशमध्ये राहतात. यासाठी ॲप उघडा > Library वर क्लिक करा त्यानंतर Trash मध्ये जाऊन फोटो निवडा आणि रिकव्हर करा.

आयफोन वापरकर्ते त्यांचे फोटो iCloud वरून परत मिळवू शकतात. फोटो ॲपमधील अल्बम्समध्ये जाऊन Recently Deleted फोल्डर निवडा आणि हवे असलेले फोटो पुन्हा रिस्टोअर करा.

जर वरील फोल्डरमधूनही फोटो डिलीट झाले असतील, तर गुगल ड्राइव्ह किंवा आयक्लॉड बॅकअप कामाला येतो. मात्र, फोन रिसेट करून बॅकअप घेताना सध्याचा नवीन डेटा जाण्याची भीती असते, त्यामुळे हे सावधगिरीने करावे.

इंटरनेटवर फोटो रिकव्हरीसाठी अनेक ॲप्स उपलब्ध आहेत. पण ते वापरताना काळजी घ्या. कारण यामुळे तुमच्या फोनमधील खाजगी माहितीला धोका निर्माण होऊ शकतो. शक्यतो फोनमधील अधिकृत पर्यायांचाच वापर करा.