
उन्हाळा म्हटलं की प्रत्येकाला आंब्याची चाहूल लागते. आंबा असं म्हटलं तरी प्रत्येकाच्या तोडांला पाणी सुटतं. आंबा हा शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर गोड, रसाळ, पिवळसर केशरी रंगाचा ‘हापूस आंबा’ दिसायला लागतो.

कोकणातील हापूस आंब्याची चव ही अतिशय अप्रतिम असते. आंबा खाण्यासोबतच अनेक खवय्ये आमरसाचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच असते.

उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाच्या घरात एक दिवस तरी आमरस पुरीचा बेत हा ठरलेलाच असतो. मात्र अनेकदा घरी बनवलेला आमरस लवकर काळा पडतो.

यामुळे अनेक जण घरी आमरस बनवणं टाळतात. पण आता काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरुन घरी बनवलेला आमरस जास्त काळ फ्रेश ठेवू शकता.

त्यामुळे चविष्ट आमरस बनवताना आणि तो साठवताना काही चुका झाल्यास तो खराब होऊ शकतो.

आमरस बनवण्यासाठी नेहमी पूर्णपणे पिकलेले आंबे निवडा. काही मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा.

आमरस काढण्यासाठी मिक्सरचा वापर करु नका. कारण स्टीलच्या संपर्कात आल्याने आंब्यातील ऍसिडिक घटकांची रासायनिक क्रिया होऊन आमरस लवकर काळा पडू शकतो.

आंब्याचा रस काढल्यानंतर त्यात चवीनुसार साखर घाला आणि रवीच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करा. जेणेकरुन तो काळा पडणार नाही.

आमरसमध्ये चुकूनही दूध घालू नका. दुधामुळे आमरस लवकर खराब होण्याची शक्यता असते.

आमरस काढल्यानंतर त्यात आंब्याची एखादी कोय घालून ठेवा. यामुळे आमरस सुमारे ७ ते ८ तास काळा पडत नाही.

जर तुम्हाला आमरस फ्रिजमध्ये ठेवायचा असेल, तर तो शक्यतो काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा.

आमरस तयार झाल्यावर तो हवाबंद डब्यात झाकण लावून ठेवा.

आंब्याचा रस काढण्यापूर्वी आंबे स्वच्छ पाण्यात किंवा गरम पाण्याने धुवून घ्या.