
राज्यातील 250 पेक्षा अधिक नगरपालिका आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान होत आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे 24 नगरपालिका आणि 154 सदस्यांच्या निवडीसाठी आता 20 डिसेंबरला मतदान होईल. तर मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे.

मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस म्हणत अनेकजण टाळाटाळ करतात. परंतु अकोल्यातील अकोटमध्ये 104 वर्षीय आजीने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. इतकंच नव्हे तर जिवंत आहे तोपर्यंत मतदानाचा हक्क बजावणार असं या आजीने ठामपणे सांगितलं आहे.

आज अकोला जिल्ह्यात चार नगरपालिका आणि एका नगरपंचायतसाठी मतदान होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसत आहे.

नाशिकमधल्या ओझर नगरपरिषदेसाठी मतदान पार पडलं. इथं 100 वर्षीय पार्वतीबाई चौधरी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. वयाच्या शंभराव्या वर्षीही मतदान केंद्रावर येऊन मतदान करून त्यांनी तरुण पिढीसमोर आदर्श ठेवला आहे.

दुसरीकडे लोकशाहीसाठी बिबट्याची दहशत बाजूला ठेवून पुण्यातील मंचर इथं 73 वर्षीय अल्का दोषी यांनी मतदान केलं आहे. परिसरात बिबट्याची दहशत असतानाही न घाबरता त्या सर्वात आधी मतदान केंद्रावर पोहोचल्या. देशाची लोकशाही टिकवण्यासाठी बिबट्याची भीती बाळगण्याची गरज नाही, असं म्हणत त्यांनी भावी पिढीसमोर आदर्श ठेवला.