
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नवी मुंबई विमानतळाचा दौरा केल्यानंतर या विमानतळाच्या उर्वरित कामांना वेग आला आहे. विमानतळ सप्टेंबरनंतर सुरू होईल, असे बोलले जात आहे.

मात्र, या विमानतळापासून तीन किलोमीटरच्या अंतरामध्ये उलवे येथे असलेल्या मटण आणि चिकन विक्रेत्यांच्या दुकानांमुळे पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या मांसावर पक्षी येऊन विमानाच्या उड्डाणावेळी पक्षी विमानाला धडकण्याचा धोका असल्याची भीती त्यांनी प्राधिकरणाकडे व्यक्त केली आहे.

तसेच, याबाबत राज्य सरकारकडे तक्रार केल्यानंतरही दुकानांवर कारवाई न झाल्याने पर्यावरणवाद्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टीजवळील उलवे येथील बेकायदा कत्तल रोखण्यासाठी नॅट कनेक्ट फाउंडेशनने डीजीसीएकडे तक्रार केली आहे.

आता याबाबत राज्याचे मुख्यमंत्री यांनादेखील पत्र पाठवणार आहोत, असे या फाऊंडेशनच्या सदस्यांनी सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.